हिटमॅनची जबऱ्या फिल्डिंग; जेसनच्या 'रॉयल' खेळीला घातलं 'वेसण' (VIDEO)
रोहित शर्माने जबऱ्या फिल्डिंग करत चेंडू नुसता अडवला नाही. तर भारतीय संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचे काम केले.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 300+ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दिमाखदार सुरुवात केली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्ट्रोने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करुन भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. पहिल्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी करणाऱ्या जोडीने 'करो वा मरो'च्या लढतीत 110 धावांची भागादारी केली. हिटमॅन रोहित शर्माने ही जोडी फोडण्यात मदत केली. इंग्लंडच्या डावातील 17 व्या षटकातील कुलदीपच्या तिसऱ्या चेंडूवर बेयरस्ट्रोने स्ट्रोक खेळला. यावेळी रोहित शर्माने जबऱ्या फिल्डिंग करत चेंडू नुसता अडवला नाही. तर भारतीय संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचे काम केले. नॉन स्ट्राईकवर असलेल्या जेसन रॉयने 55 धावांवर विकेट फेकली.
भारत-पाकमध्ये त्रयस्थ ठिकाणी टी-20 मालिका? दुबईतील बैठकीवर खिळल्या नजरा
ही जोडी फोडण्यात यश आले असले तरी त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहित शर्माने उत्कृष्ट फिल्डिंगचा दाखवलेली झलक सोडली तर दुसऱ्या वनडेत कोणतीही गोष्ट भारताच्या बाजूने घडताना दिसली नाही. बेन स्टोक्सने बेयरस्ट्रोच्या साथीनं 32 चेंडूत 91 धावा कुटल्या. भुवनेश्वरने बेन स्टोक्सला 99 धावांवर बाद केले.
Just brilliance by @ImRo45#RohitSharma #INDvsENG pic.twitter.com/bRIb6oCFl8
— Mr. Critic (@ChiragA45) March 26, 2021
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 336 धावा केल्या होत्या. सलामीवीर लोकेश राहुलने 108(114), विराट कोहली 66 (79), पंत 77 (40) , हार्दिक पांड्या 35 (16), कृणाल पांड्या 12 (9) धावा केल्या. रोहित-शिखर धवन जोडीने पहिल्या विकेटसाठी केवळ 9 धावांची भागीदारी केली. धवन चार धावा करुन बाद झाल्यानंतर रोहित 25 धावा करुन माघारी फिरला.