शाळा बंद तरिही मुंबईत एवढ्या शाळा क्रीडा स्पर्धा खेळण्यास तयार

संजय घारपुरे
Sunday, 2 August 2020

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा या मोसमात होणार अथवा नाही, याबाबत संभ्रम होता. पण मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत 92 शाळांनी प्रवेशिका पाठवल्या असल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेस यंदाही चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा बाळगली जात आहे. 

मुंबई : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा या मोसमात होणार अथवा नाही, याबाबत संभ्रम होता. पण मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत 92 शाळांनी प्रवेशिका पाठवल्या असल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेस यंदाही चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा बाळगली जात आहे. 

गतमोसमात वीस क्रीडा स्पर्धांत एकंदर 47 हजार 803 खेळाडूंचा सहभाग होता. गतवर्षी 15 जुलैपासून फुटबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. मुंबई शालेय क्रीडा स्पर्धांचा मोसम 15 जुलैस फुटबॉल स्पर्धेने सुरू होतो. त्यानंतर क्रीडा स्पर्धा सुरू होत असे. सप्टेंबरपासून स्पर्धांना वेग येत असे; पण यंदा शाळाच सुरू न झाल्याने प्रश्न आला आहे. त्यातच किती शाळा क्रीडा स्पर्धांत सहभागी होतील, हाच प्रश्न होता. 

मुंबई शालेय क्रीडा संघटनेने जुलैच्या उत्तरार्धात संलग्न शाळांना सदस्यत्वाचे फॉर्म पाठवले होते. दर वर्षी सुमारे अडीचशे शाळा हे फॉर्म शाळा सुरू होण्यापूर्वी भरून पाठवतात. मात्र या वेळी नव्वदहून जास्त शाळांनी फॉर्म पाठवले आहेत. हा प्रतिसाद नक्कीच सुखावणारा आहे, असे मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सहसचिव जोसेफ मॉंटेरिओ यांनी सांगितले. आमच्यासाठीही हा प्रतिसाद नक्कीच सुखावणारा आहे. अनेक शाळा बंद आहेत. त्या परिस्थितीत नव्वदहून जास्त शाळांचा आलेला प्रतिसाद सुखावणारा आहे. 

बुद्धिबळ, कॅरमने मोसमास सुरुवात अपेक्षित 
आम्ही नक्कीच मोसम कधी सुरू करता येईल, याचा विचार करीत आहोत. सर्व काही सरकारच्या सूचनांवर अवलंबून असेल, त्याचबरोबर शाळांचा, मुलांचा, पालकांचा प्रतिसाद कसा लाभतो, यावर अवलंबून आहे. आम्ही सुरुवातीस कॅरम, बुद्धिबळ या खेळांनी सुरुवात करू. त्या खेळांना चांगला प्रतिसाद असला तरी वयोगटानुसार स्पर्धा स्वतंत्र घेऊन गर्दी कमी करता येईल. बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच स्क्वॉशबाबतही हे घडू शकेल. सांघिक खेळांचा तूर्त विचारही करता येणार नाही. आता जरी परवानगी दिली, तरी स्पर्धांचे स्वरूप बदलणे भाग पडेल. फुटबॉलची स्पर्धा पारंपरिक साखळी पद्धतीने न घेता बाद पद्धतीने घेतल्यासच पूर्ण होऊ शकेल, असे जोसेफ मॉंटेरिओ यांनी सांगितले. मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या स्पर्धा नेमक्‍या कधी सुरू होतील, हे सांगणे अवघड आहे. जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असते. त्यास सुरुवात झाल्यावर अर्थातच आमच्याही स्पर्धा सुरू होतील. त्यांना असलेले नियमच आमच्या स्पर्धांसाठीही असतील, असेही त्यांनी सांगितले. 

(2019-20 च्या मोसमातील) 

खेळ शाळा संघ सहभाग 
जलतरण 97 949
ऍथलेटिक्‍स 186 3199
बॅडमिंटन 176 1018
बास्केटबॉल 123 228
बॉक्‍सिंग 58 205
कॅरम 81 411
बुद्धिबळ 178 1352
क्रिकेट 358 4388
फुटबॉल 276 1176
जिम्नॅस्टिक 137 592
हॅंडबॉल 49 229
हॉकी 44 129
कबड्डी 38 77
खो-खो 26 51
ज्यूदो 144 926
स्क्वाश 28 170
टेबल टेनिस 72 609
टेनिस 109 499
थ्रो बॉल 66 132
व्हॉलीबॉल 45 125

एकंदर 2 हजार 505 संघांचा सहभाग, तसेच 47 हजार 803 खेळाडू खेळले 
हॅरिस ढालमध्ये 143, गाईल्स ढालमध्ये 126 आणि मुलींच्या स्पर्धेत 27 संघ


​ ​

संबंधित बातम्या