World Cup 2019 : रबाडाला आयपीएलपासून रोखत होतो; पण... 

वृत्तसंस्था
Monday, 24 June 2019

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवास लाजिरवाणा असे संबोधणाऱ्या दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ डुल्लेसीने यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाची कामगिरी फारच सुमार झाल्याचे मान्य केले. त्याचवेळी हुकमी आणि प्रमुख गोलंदाज कासिगो रबाडाला आयपीएलमध्ये खेळू नये अशी सुचना आम्ही करत होतो

वर्ल्ड कप 2019 : लंडन : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवास लाजिरवाणा असे संबोधणाऱ्या दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाची कामगिरी फारच सुमार झाल्याचे मान्य केले. त्याचवेळी हुकमी आणि प्रमुख गोलंदाज कासिगो रबाडाला आयपीएलमध्ये खेळू नये अशी सुचना आम्ही करत होतो, अशी माहितीही त्याने उघड केली. लॉर्डस्‌च्या मैदानावर रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला त्रिशतकी आव्हान झेपले नाही आणि पराभवाबरोबर त्यांचे स्पर्धेतले आव्हानही संपुष्टात आले. 

दोन साखळी सामने शिल्लक असण्यापूर्वीच विश्‍वकरंडक स्पर्धेतून अशा प्रकारे आव्हान संपुष्टात येणे हा आपल्या कारकिर्दीतला सर्वात निच्चांकी क्षण होता, असे ड्यू प्लेसिसने जाहीरपणे सांगितले. पाकिस्तानविरुद्धचा पराभव आणि स्पर्धेतील इतर सामन्यातीलही कामगिरी यावर ड्यू प्लेसिसने भाष्य केले त्यात त्याने रबाडाने आयपीएल खेळण्याबाबतही मतप्रदर्शन केले. वर्ल्डकपमध्ये रबाडाला सात सामन्यात मिळून 50.83 च्या सरासरीने सहाच विकेट मिळवता आल्या. 

रबाडावरील ताण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता का? या प्रश्‍नावर बोलताना ड्यू प्लेसिसने, मी कदाचीत या प्रश्‍नावर अचुक उत्तर देऊ शकणार नाही, असे मत व्यक्त केले परंतु रबाडाने यावेळची आयपीएल खेळू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, असा खुलासा केला. पुढे तो म्हणतो, विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी रबाडा तंदुरुस्त आणि ताजेतवाना रहाणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. तो आयपीएल खेळण्यास गेला तरिही मध्यावरून त्याने परत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो हे त्याच्यासाठीच नव्हे तर इतर खेळाडूंसाठीही महत्वाचे होते. 

विश्‍वकरंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रबाडा "रिहॅब' आणि पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याऐवजी आयपीएलमध्ये गोलंदाजी करत होता, असे सांगून ड्यू प्लेसिस म्हणाला, तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळायला हवी, हे मी आयपीएल सुरु होण्याअगोदर पासून सांगत होता. तिन्ही प्रकार खेळणे त्याचबरोबर आयपीएल हा त्या खेळाडूंवर अधिक ताण पडणारा होता. आयपीएल खेळणे हे आमच्या अपयशाचे प्रमुख कारण नाही, पण ते एक वास्तव आहे. 

आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये रबाडाला विश्रांती देऊ शकत नाही, अशा परिस्थितीत गोलंदाजांची दुसरी फळी सक्षम असणे महत्वाचे आहे. चार-पाच वेगवान गोलंदाज संधी कधी मिळणार या प्रतिक्षेत असायला हवे अशा प्रकारची तयारी हवी होती, अशी खंत ड्यू प्लेसिसने व्यक्त केली. 

डेल स्टेन आणि आयपीएल 
दक्षिण आफ्रिकेला प्रामुख्याने डेल स्टेनच्या दुखापतीचा फटका बसला. आयपीएल सुरु होण्यापूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त नव्हता, तरिही तो आयपीएलमध्ये आला आणि दोन सामने खेळला, पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. वर्ल्डकपसाठी तो लंडनमध्ये आला परंतु तंदुरुस्ती नसल्याने त्याला माघार घ्यावी लागली.  


​ ​

संबंधित बातम्या