एफसी गोवा संघाची चेन्नईयीन एफसीवर तीन गोलांनी सहज मात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

- एफसी गोवा संघाने  दणकेबाज कामगिरी करताना दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीवर ३-० फरकाने सहजपणे मात केली.

- एफसी गोवाने चेन्नईयीन एफसीविरुद्ध सलग चौथा विजय नोंदविला.

पणजी -  एफसी गोवाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला विजयाच्या पूर्ण गुणांचे लक्ष्य बाळगले होते, खेळाडूंनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गोल धडाका राखला. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सहाव्या मोसमाची सुरवात विजयाने करणे गतउपविजेत्यांना शक्य झाले. त्यांनी दणकेबाज कामगिरी करताना दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीवर ३-० फरकाने सहजपणे मात केली.
सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सेईमेनलेन डुंगल याने पूर्वार्धात तिसाव्या मिनिटास केलेला पहिला गोल, नंतर ६२व्या मिनिटास फेरान कोरोमिनास (कोरो) याने साधलेला अचूक नेम आणि ८१व्या मिनिटास कार्लोस पेना याची भेदक व्हॉली या बळावर एफसी गोवाने चेन्नईयीन एफसीविरुद्ध सलग चौथा विजय नोंदविला. गतमोसमातील दोन्ही आयएसएल सामन्यांत, तसेच सुपर कपच्या अंतिम लढतीत गोव्याचा संघ चेन्नईच्या संघाला भारी ठरला होता.
आपल्या संघातील परदेशी खेळाडू नवे आहेत, त्यांना जम बसविण्यास वेळ लागू शकतो ही चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांची भीती सुमारे १३ हजार फुटबॉलप्रेमींच्या साक्षीने खेळल्या गेलेल्या सामन्यात खरी ठरली. एफसी गोवाने सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले. चेन्नईयीनने क्वचितच एफसी गोवा संघाच्या बचावफळीची परीक्षा पाहिली.
एफसी गोवातर्फे पहिलाच आयएसएल मोसम खेळणाऱ्या लेन डुंगल याने निवडीस न्याय दिला. चेन्नईयीनच्या बॉक्सच्या उजव्या बाजूने मानवीर सिंगने दिलेल्या पासवर लेन याने डाव्या पायाच्या फटक्यावर गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले. यावेळी चेंडू चेन्नईयीनचा बचावपटू एलि साबिया याला आपटून डुंगलच्या दिशेने गेला होता. सामन्यातील साठ मिनिटांच्या खेळानंतर, कोरो याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक ३५वा गोल नोंदविला. सलग दोन मोसम गोल्डन बूटचा मानकरी ठरलेल्या स्पॅनिश खेळाडूने जॅकिचंद सिंगच्या असिस्टने नीटपणे फटका मारला. मानवीरकडून मिळालेल्या चेंडूवर जॅकिचंदने कोरोस सुरेख क्रॉसपास दिला होता. सामना संपण्यास नऊ मिनिटे असताना एफसी गोवाने सामन्याचा निकाल निश्चित केला. ब्रँडन फर्नांडिसच्या फ्रीकिकवर पेना याने प्रतिस्पर्धी बचावपटू चेंडू ताबा घेण्यापूर्वी, दमदार व्हॉली फटक्यावर संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली.


​ ​

संबंधित बातम्या