भारतीय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने क्रीडा आचारसंहिता फेटाळली

वृत्तसंस्था
Monday, 11 November 2019

- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) निलंबनाची भीती

- आचारसंहितेमुळे क्रीडा महासंघाच्या स्वायत्ततेवर घाला

- सध्या 2011 मध्ये आस्तित्वात आलेली आचारसंहिता लागू आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) निलंबनाची भीती व्यक्त करत भारतीय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने 2017 मध्ये तयार केलेला क्रीडा आचारसंहितेचा संपूर्ण आराखडा फेटाळून लावला. 
क्रीडा प्रशासकांचे वय आणि कालावधी निश्‍चित करण्याची तरतूद या आचारसंहितेतून करण्यात आली आहे. देशातील सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघाने याला विरोध केला आहे. असे सगळे असताना केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी क्रीडा आचारसंहितेच्या आराखड्याविषयी मते मागितल्याबद्दल "आयओए'ने आश्‍चर्य व्यक्त केले. रिजीजू यांच्या आदेशानंतर क्रीडा संचालकांनी आचारसंहितेसंदर्भात 10 नोव्हेंबरपर्यंत मत नोंदविण्यास सांगितले होते. 
या संदर्भात "आयओए' सचिव राजीव मेहता यांनी क्रीडा आचारसंहितेत केलेले सर्व बदल फेटाळून लावले आहेत. मेहता म्हणाले, ""सर्व सदस्यांसह "आयओए'ने आचारसंहिता फेटाळून लावली आहे. आचारसंहितेमुळे क्रीडा महासंघाच्या स्वायत्ततेवर घाला असून, यामध्ये थेट केंद्र सरकारचा हस्तक्षेप दिसून येतो. अशी आचारसंहिता मान्य केल्यास "आयओसी'कडून निलंबनाची कारवाई होऊ शकते.'' 
यापूर्वी डिसेंबर 2012 मध्ये सरकारच्या हस्तक्षेपामुळे "आयओसी'ने "आयओए'चे निलंबन केले होते. त्यानंतर क्रीडा महासंघाच्या स्वायत्तेच्या आड येणार नाही, असे आश्‍वासन क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आल्यानंतर 14 महिन्यांनी हे निलंबन उठविण्यात आले होते. 
क्रीडा आचारसंहिता तयार करताना एकत्र बसून काम केले जाईल असे ठरले होते. पण, त्यापूर्वीच थेट आचारसंहितेबाबत अभिप्राय मागविण्याच्या निर्णयाने आम्ही चकित झालो आहोत, असेही "आयओए'ने म्हटले आहे. सध्या 2011 मध्ये आस्तित्वात आलेली आचारसंहिता लागू आहे. नव्या आचारसंहितेचा आराखडा 2017 मध्ये तयार करण्यात आला आहे. 
------------ 

काय सुचवले होते बदल 
- आमदार, खासदारांसह शासकीय कर्मचारी राष्ट्रीय क्रीडा महासंघात नसावेत 
- पदाधिकाऱ्यांच्या वयोमर्यादेवरही बंधने, वयासाठी देखील 70 वर्षांची अट 
- राष्ट्रीय क्रीडा महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकपालाची नियुक्ती करावी 
- अनुभवी खेळाडूंचा संघटनेत सहभाग असावा 
- सर्व महासंघाने क्रीडापटू आयोग नेमावा 
- आचारसंहिता अमलात आल्यास आयओए आणि क्रीडा महासंघाने सहा महिन्यांत घटना तयार करावी लागेल 


​ ​

संबंधित बातम्या