खेळाच्या रिंगणातील 'मॉमेन्ट ऑफ मॅडनेस' आणि बरंच काही!

सुनंदन लेले  
Sunday, 3 January 2021

क्रीडा जगतानं या वर्षांत विविध रंग दाखवले. नोवाल जोकोविचला खूप मोठा आघात याच वर्षी सहन करावा लागला ज्याला इंग्रजी भाषेत ''मॉमेन्ट ऑफ मॅडनेस'' म्हटलं जातं. अमेरिकन खुल्या स्पर्धेत अप्रतिम खेळ करून विजेतेपदाकडे वाटचाल करत असताना तो प्रसंग घडला.

मेलबर्न कसोटीत पुनरागमन करून दाखवत भारतीय क्रिकेट संघानं मालिका एक -एक अशी बरोबरीत आणली. सगळ्यांकरता 2020 हे वर्ष आव्हानात्मक गेलंय. मात्र या वाईट वर्षाची सांगता सकारात्मक झाली. नवे वर्ष, नेहमी नव्या आशा आकांक्षांना बरोबर घेऊन येत असते. 2020 हे वर्ष त्याला वाईट अर्थानं अपवाद ठरले. हे वर्ष सुरू होताना चीनमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झालेले होते. त्याची व्याप्ती इतकी भयानक होईल म्हणजे तो जगभर पसरेल याचा कोणालाच अंदाज नव्हता. त्यानंतर कोरोना किती झपाट्याने पसरला हे आपण सगळ्यांनी अनुभवले. संपूर्ण एक वर्ष याच साथीने आपल्या सगळ्यांना छळले. 2021 या वर्षांचा उदय झाला असताना कोरोना संदर्भात किमान लस तयार झाली आहे. पौराणिक कथांमध्ये मायावी राक्षस आपलं रूप बदलायचा तसं कोरोनाचा विषाणू रूप बदलत आहे म्हणून संकट दूर झाले आहे असे अजिबात गृहीत धरून चालणार नाहीये. पण एक नक्की आहे की 2020 ज्यारितीनं  वाईट गेलं त्याचा विचार करता 2020 ची सांगता किमान सकारात्मक झाली. एकीकडं लस देण्याचं काम जगात अनेक ठिकाणी सुरू झालंय आणि दुसरीकडं भारतीय क्रिकेट संघानं अविश्वसनीय विजय मिळवून सगळ्यांना नवीन वर्षाची भेट आणि एक प्रकारे सकारात्मक शुभेच्छा दिल्या आहेत.   

जपानला मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये जायचा योग जमून आला होता. टोकियो शहरातील मुख्य ऑलिम्पिक स्टेडियमला वाकडी वाट करून मी उत्साहाने जाऊन आलो होतो. जपानी लोकांनी त्यांच्या स्वभावाला जागून स्पर्धेची सर्व तयारी व्यवस्थित करून ठेवली होती. नागरिकही खेळाडू आणि पर्यटकांचं स्वागत करायला उत्साहाने तयार होते. ऑलिम्पिक स्पर्धा 2020 च्या 24 जुलैला सुरू होऊन 9 ऑगस्टला संपणार होत्या.  सगळ्या उत्साहावर पाणी पडले जेव्हा कोरोनामुळे स्पर्धा लांबणीवर टाकण्यावाचून पर्याय राहिला नाही. आता टोकियो ऑलिम्पिक 23 जुलै ते 21 ऑगस्ट 2021 दरम्यान भरवल्या जातील. 

अन् ऑस्ट्रेलियन दिग्गजानं पाहिलं स्मिथ-कोहली पार्टनरशिपच स्वप्न

स्पर्धा लांबणीवर गेल्याचा किती मोठा आर्थिक फटका जपान सरकारला सहन करावा लागणार आहे हे पाहिलं तर ही रक्कम म्हणजे त्याचा आकडा वाचला तरी  चक्कर येईल. 17 हजार 500 कोटी रुपये. होय होय होय साडेसतरा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा जपानला सहन करावा लागणार आहे. 

2020 मध्ये ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये ‘ट्वेन्टी-20’ जागतिक करंडक स्पर्धा भरवली जाणार होती, ती सुद्धा पुढे ढकलवी लागली आहे. वाईट या गोष्टीचे वाटते कि महामारीचे हे संकट अजून दूर झाले नसल्याने क्रीडा विश्‍वातली 
अस्थिरता संपली नाही.  

क्रिकेट संघाचा प्रवास

भारतीय क्रिकेट संघालाही 2020 या वर्षांनं तसे मोठे धक्के दिले. 2019 मध्ये विराट कोहलीच्या संघानं दणादण कसोटी सामने जिंकत ‘ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’मध्ये जबरदस्त मजल मारली होती. 2020 च्या सुरुवातीला भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळला आणि दोन्हीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कोरोनाच्या अडचणीमुळे ‘आयसीसी’ला  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमात बदल करणं क्रमप्राप्त झालं. वाटत होतं कि भारतीय संघ आरामात पहिल्या दोन संघात असेल पण नवीन नियमांनी त्या गणिताला धक्का बसला. आता भारतीय संघाला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा अंतिम सामना 2021 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळायचा असेल तर प्रथम ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अंगणात पराभूत करावे लागेल आणि मग तगड्या इंग्लंड संघाला मायदेशात हरवावे लागेल. थोडक्यात आठ कसोटी सामन्यांपैकी पाच कसोटी सामन्यात विजय मिळवला तरच अंतिम सामन्यात भारतीय संघ दिमाखात दाखल होईल. बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून आव्हान पेलण्याची सुरुवात मोठ्या थाटात झाली आहे.  

Target_2021 : "झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित"  

क्रीडा जगतानं या वर्षांत विविध रंग दाखवले. नोवाल जोकोविचला खूप मोठा आघात याच वर्षी सहन करावा लागला ज्याला इंग्रजी भाषेत ''मॉमेन्ट ऑफ मॅडनेस'' म्हटलं जातं. अमेरिकन खुल्या स्पर्धेत अप्रतिम खेळ करून विजेतेपदाकडे वाटचाल करत असताना तो प्रसंग घडला. एक महत्वाचा गुण खराब फटका मारून गमावल्याने जोकोविच स्वतःवर नाराज झाला. पुढची सर्व्हिस करण्याअगोदर हाती आलेला अतिरिक्त चेंडू वेगाने परत देण्याची अनपेक्षित चूक केली. चेंडू परत करताना नोवाकने मनगटाचा झटका देत रॅकेटने तो परतवला, जो अचानक तुफान वेगाने गेला आणि लाइन अम्पायरच्या अचूक गळ्यावर आदळला. ती महिला पंच आघाताने खाली कोसळली आणि नोवाक जोकोव्हिचला नियमानुसार स्पर्धेतून बाहेर काढले गेले. ''नकळत घडले सारे'' ही ओळ आठवावी असा तो प्रसंग होता. आपल्या सगळ्यांच्या जीवनात असे प्रसंग घडू शकतात. एखादी बाब जाणूनबुजून केली नाही, तरी मोठी चूक हातून घडू शकते. जरी ती कृती अनवधानानं घडली तरी त्याचा परिणाम घातक ठरतो हे या प्रसंगातून शिकण्यासारखे होते.

भयानक अशा या वर्षाची, 2020 ची सांगताही धक्कादायक झाली. भारतीय क्रिकेट चाहत्यांकरता 19 डिसेंबर 2020 चा दिवस प्रचंड निराशाजनक ठरला. ऍडिलेड कसोटी सामन्याचे पहिले दोन दिवस चांगला खेळ करून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघासमोर आव्हान उभे केले होते. सामना अजून रंगणार वाटत होता, कारण भारतीय संघानं  50 पेक्षा जास्त धावांची आघाडी संपादली होती. 19 डिसेंबर रोजी म्हणजे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या एका तासात भारतीय संघाचा दुसरा डाव 36 धावांमध्ये गुंडाळला गेला. ही नीच्चांकी धावसंख्या झाली. सामना तर हातातून गेलाच पण त्या बरोबर इज्जत पण धुळीला मिळाली. 

अर्थातच या अशा जीवघेण्या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेचा भडिमार झाला. चाहत्यांनी कडवट शब्दात नाराजी प्रकट केली, जे अपेक्षित होते. मनात एकच प्रश्न येत होता की 36 धावामध्ये बाद होण्याइतका भारतीय संघ खरोखर इतका कमकुवत आहे का, आणि याचे उत्तर नक्कीच नाही असे येत होते. अगोदर ठरल्याप्रमाणे कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशात परतणार होता. त्यातून अजून एक धक्का म्हणजे वेगवान गोलंदाज महम्मद शमी दुखापतीने त्रास होऊन विराटसोबत मायदेशी परतला. एकंदर सगळी परिस्थिती बघून परदेशातल्या माजी खेळाडूंनी भारतीय संघ ही मालिका 4-0 अशा फरकानं हरणार या मतावर शिक्का मारला. नकारात्मक विचारांचे भारतीय चाहतेसुद्धा भारतीय संघ उरलेल्या 3 कसोटी सामन्यात सपाटून मार खाणार बोलू लागले. 

अडचणीचा डोंगर डोक्यावर घेऊन रहाणे नवख्या संघाला घेऊन मैदानात उतरला आणि त्यानं खेळाडूंना दडपण झुगारून सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा दिली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला 200 धावांच्या आत रोखून गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि मग रहाणेनं भन्नाट शतकी खेळी उभारून संघाला सुस्थितीत नेले. भारतानं कसोटी सामना जिंकून लोकांना तोंडात बोटं घालायला लावली. अविश्वसनीय पुनरागमन करून दाखवत भारतीय संघाने मालिका 1-1 बरोबरीत आणली. या एका सामन्यानं आपल्याला किती शिकवलं याचा विचार करा. सतत अडचणी आणि संकटांचा नकारात्मक विचार करायचा, की त्यामध्ये लपलेल्या संधीला शोधून क्षमतेला न्याय देणारी कामगिरी करायचे ध्येय समोर ठेवायचे. हातात काय नाही याचा विचार करत कुढत बसायचं का साथीला कोण आहे याचा सकारात्मक विचार करून लढाईला जायचं हा विचार नको का व्हायला?  सगळ्यांकरता 2021 हे वर्ष आव्हानात्मक गेलंय. निदान वाईट वर्षाची सांगता सकारात्मक झाली आहे आणि मेलबर्न कसोटीतील विजयानं सकारात्मक प्रेरणा मिळाली आहे. 2021 हे वर्ष  नव्या आशांची पहाट घेऊन उदयाला आलं.

सुनंदन लेले  

saptrang@esakal.com


​ ​

संबंधित बातम्या