INDvsENG : निर्णायक सामन्यातील हिरो सॅमच्या संघर्षाची 'अनटोल्ड स्टोरी'
मॅचमध्ये त्याने ज्याप्रमाणे संघर्ष केला अगदी तसाच संघर्ष त्याला आयुष्यातही करावा लागलाय. त्याची ही कहाणी बऱ्याच जणांना माहित ही नसेल.
पुण्याच्या मैदानात रंगलेल्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना जिंकून भारतीय संघाने मालिका जिंकली. पण मॅचचा खरा हिरो ठरला तो सॅम कुरेन. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर लोअर ऑर्डरला येऊन त्याने विक्रमी खेळी साकारली. त्याची ही खेळी विश्वविजेत्यांना वनडे मालिकेतील विजयाचा आनंद देण्यास उपयुक्त ठरली नसली तरी शेवटपर्यंत जिद्द सोडायची नसते, हा संदेश देणारी होती. यशापेक्षा बऱ्याचदा संघर्षमयी प्रवास हा खूप काही शिकवून जाणारा असतो. तशीच काहीशी अनुभूती सॅम कुरेनची खेळी पाहताना अनुभवायला मिळाले. मॅचमध्ये त्याने ज्याप्रमाणे संघर्ष केला अगदी तसाच संघर्ष त्याला आयुष्यातही करावा लागलाय. त्याची ही कहाणी बऱ्याच जणांना माहित ही नसेल.
सॅम कुरेन झिम्बाब्वेच्या अष्टपैलू क्रिकेटरचा मुलगा
इंग्लंडकडून अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या सॅम कुरेनला क्रिकेटचा वारसा लाभलाय. त्याचे वडिल केविन कुरेन हे झिम्बाब्वेचे अष्टपैलू खेळाडू होते. सॅमचे आजोबाही क्रिकेटरच होते. त्याचा भाऊ टॉम कुरेनलाही आपण सर्वांनी त्याच्यासोबत खेळताना पाहिले आहे. दोघेही बंधू आयपीएलमध्येही वेगवेगळ्या टीमकडून खेळतात. टॉमशिवाय बेन कुरेन हा देखील सॅमचा भाऊ इंग्लिश काउंटी क्रिकेट खेळतो. 22 वर्षीय सॅम कुरेन याने 2018 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. झिम्बाब्वेच्या क्रिकेटरचा मुलगा इंग्लंडकडून कसा खेळतो हा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल. यामागे त्याच्या कुटुंबियांची संघर्षमय कहाणी दडली आहे.
धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)
झिम्बाब्वे आंदोलनात सॅमच्या वडिलांना जमीन सोडावी लागली
नॉर्थम्प्टनमध्ये 3 जून 1998 मध्ये सॅम कुरेनचा जन्म झाला. त्याचे वडिल नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट खेळायचे. जेव्हा सॅम कुरेनचा जन्म झाला त्यावेळी कसोटीत सर्वाधिक विकेट (600 +) घेणारा जलदगती गोलंदाज जेम्स अँड्रसन लंकाशायर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली होती. सॅम कुरेन आता आपल्या ड्रिम होरो अर्थात अँड्रसनसोबत खेळताना पाहायला मिळते. सॅम कुरेनचे वडिल केविन आपल्या कुटुंबियांसोबत हरारेच्या बाहेर एका फॉर्महाऊसमध्ये वास्तव्य करायचे. त्यांनी आपला छोटा मुलगा सॅम याला वयाच्या चौथ्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये जमीनीसंदर्भातील आंदोलन सुरु होते. यावेळी केविन कुरेन यांना जमीन खाली करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी सॅम कुरेन अवघ्या 7 वर्षांचा होता.
ऑस्ट्रेलियन मिचेल मार्श आणि शॉन मार्चसोबत घालवले आहे सॅमने आपले बालपन
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि झिम्बाब्वेचे तत्कालीन क्रिकेच कोच ज्यॉफ मार्श यांनी सॅम कुरेनच्या वडिलांची मदत केली. केविन झिम्बाब्वे बोर्डाशू जोडले गेले. कुरेन भावंडांचे (टॉम, बेन, सॅम) आणि मार्श भावंडाचे (शॉन आणि मिचेल) याचे बालपन एकत्रित गेले.
सॅम कुरेन झिम्बाब्वेकडूनही खेळलाय
सॅमने झिम्बाब्वेकडून अंडर-13 क्रिकेटही खेळला आहे. सॅम 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी क्रिकेटमधील अनेकांनी कुरेन कुटुंबियांची मदत केली. इंग्लंडचे माजी खेळाडू एलन लँब यांनी सॅमची आई सारा यांना कुटुंबियांसहित इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबिय इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. सॅम आपल्या भावंडांसह लंडनजवळील वेलिंगटन कॉलेजमध्ये शिकला. याठिकाणी त्याला स्कॉलरशिपही मिळायची. वयाच्या 17 व्या वर्षांपासून सॅमने सरे टीमकडून खेळण्यास सुरुवात केली. त्याने पदार्पणातच इंग्लंडचा माजी क्रिकेटर एलेक स्टीवर्ट यांना प्रभावित केले. सॅम प्रतिभावंत खेळाडू असल्याचे त्यांनी म्हटले होते. सॅम करिअरच्या सुरुवातीला लॅपटॉपवर व्हिडिओ पाहून दुसऱ्या देशातील खेळाडूंचे व्हिडिओ पाहून क्रिकेटचे धडे घ्यायचा. तो केवळ क्रिकेटच नाही तर अन्य काही खेळातही मैदानात उतरला आहे. तो दोन्ही हातांनी टेनिस खेळू शकतो. आपल्या भावांसोबत तो गोल्फच्या स्पर्धेतही उतरला आहे.