विराट भावा, तुझं नेमकं चाललंय तरी काय?

नामदेव कुंभार
Thursday, 18 March 2021

ज्यावेळी संघ जिंकतो तेव्हा खेळाडूंच कौतुक होत असते आणि ज्यावेळी संघ पराभवाचा सामना करतो. त्यावेळी टीमच्या चुकांची जाणीव होते.
 

कसोटीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडनं टी-20 मध्ये चांगलेच नाकीनऊ आणलं आहे. इंग्लंडनं दोन्ही सामन्यात भारतीय संघाला अक्षरश: मातीत लोळवलं. भारत मायदेशातच खेळतोय का? असा प्रश्न पराभवानंतर मनात येऊन जातो. मुळात आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांवर नजर फिरवल्यास विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या चुका दिसून येतील. ज्यावेळी संघ जिंकतो तेव्हा खेळाडूंच कौतुक होत असते आणि ज्यावेळी संघ पराभवाचा सामना करतो. त्यावेळी टीमच्या चुकांची जाणीव होते.

विराटची सर्वात मोठी चूक -

इंग्लंडविरोधातील मालिकेतील विराटची सर्वात मोठी चूक म्हणजे, स्पेशलिस्ट गोलंदाज न खेळवणं होय. टी-20 या वेगवान खेळप्रकारात तुम्ही फक्त चार गोलंदाजानिशी मैदानात उतरणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे. दुसऱ्या सामन्यात नशीबानं साथ दिल्यामुळे अखेरच्या दहा षटकांत इंग्लंडच्या फंलदाजांना रोखण्यात यश आलं. अन्यथा, 200 संघावर नजर मारल्यास तुम्हाला चहल आणि भुवनेश्वर कुमार हे दोनच स्पेशालिस्ट गोलंदाज दिसतील. पण, हार्दिक पांड्या, सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान देताना एक गोलंदाज कमी खेळवला आहे. तिन्ही सामन्यात भारताकडे एक गोलंदाज कमी होता. त्यामध्ये हार्दिक पांड्याच्या गोंलदाजीतील धारही तितकीसी प्रभावी दिसत नाही. अद्यापही तो कंबरेच्या दुखापतीतून सावरत असल्याचं दिसतेय.

INDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा! 
 

इतरांची ताकद, भारताची कमकुवत बाजू

अष्टपैलू खेळाडू संघाला समतोल बनवतो पण भारताबाबत इथं वेगळेच घडतेय. अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाचं समतोल ढासळल्याचं दिसतेय. विराट कोहलीचं नेमकं काय सुरु आहे. हेच समजच नाही. विश्वचषकाला अवघे सात ते आठ महिन्याचा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थिती तुमच्याकडे प्रयोग करण्यासाठी पुरेसा वेळही नाही. तसं असतानाही वारंवार प्रयोग का केले जात आहेत. हे गणित न उमगण्यासारखं झालं आहे. 

आघाडीच्या फळीबाबत काय?

भारतीय संघानं तीन सामन्यात तीन वेगवेगळ्या सलामीच्या जोडी मैदानात उतरवल्या. पहिल्या सामन्यात शिखर-राहुल, दुसऱ्या सामन्यात इशान-राहुल आणि तिसऱ्या सामन्यात रोहित-राहुल, यापैकी एकाही जोडी मैदानात तीन षटकेही स्थिरावू शकली नाही. जर राहुलला तीन सामन्यात संधी देण्यात आली तर शिखरला पहिल्याच सामन्यानंतर बाहेरचा रस्ता का दाखवला? दुसरा मुद्दा, इशान किशन यानं चांगली कामगिरी केल्यानंतरही सलामीची जबाबदारी का काढून घेतली. तुम्ही खेळाडूंच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहात का? एकीकडे के. एल राहुल लागोपाठ प्लॉफ ठरतोय, आणि तुम्ही इतर खेळाडूंचा बळी देत आहात. श्रेयस अय्यरनं पहिल्या सामन्यात टीमची लाज वाचवली, मात्र, पुढील सामन्यात त्याला सहाव्या-सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरवण्यात आलं. मुळात श्रेयसचा स्वभाविकपणे चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळतो. पण त्याला दुसऱ्या जागेवर फलंदाजीसाठी पाठवायचं कारण काय? टी-२० विश्वचषकापूर्वी तुमची फलंदाजीचा क्रमच ठरलेला नाही, हे न उमगण्यासारखं आहे. विराट कोहली स्वत: तिसऱ्या क्रमांकावरील जगातील सर्वात अव्वल फंलदाजामध्ये येतो. त्यानं स्वत:चेही स्थान बदललं. हे नेमकं काय चालू आहे, हे काही उमगत नाही. 

INDvsENG : रोहित IN पण; KL राहुलसाठी सूर्या झाला बळीचा बकरा!
 

गोलंदाजीबाबतही अद्याप उत्तर नाहीच -

बुमराह आणि शमी, सध्या संघाबाहेर आहेत. पण या दोघांचं पुनरागमन झाल्यानंतर तुमचे प्रमुख गोलंदाज कोण आहेत? भुवनेश्वर कुमार, बुमराह, शमी, नटराजन, सैनी आणि शार्दुल ठाकूर यापैकी तुम्ही कोणत्या गोलंदाजासह मैदानात उतरणार. सैनीसारख्या मॅचविनर गोलंदाजाला संघाबाहेर ठेवून शार्दुलला संधी देण्यामागं कारण काय?  विराट कोहलीनं वेळीच आपल्या गोलंदाजांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. अन्यथा २०१९ मध्ये झालेली चूक पुन्हा एकदा होऊ शकते.

वारंवार चहललाच संधी का?  
टी-२० सामन्यात यजुवेंद्र चहल यालाच वारंवार संधी का देण्यात येत आहे? भलेही मोक्याच्या क्षणी चहल विकेट मिळवत असला तरी तो देत असलेल्या धावांकडेही पाहायला हवं. गेल्या काही सामन्यावर नजर मारल्यास चहल प्रतिषटकाला सरासरी १० धावा देत असल्याचं दिसून येईल. कुलदीप यादव, आर. अश्विन, राहुल चहर, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यासारखे पर्याय असताना वारंवार चहललाच संधी दिली जातेय? याबाबत विराटनं विचार करायाला हवा. 

वेळीच सावध व्हा, अन्यथा!
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला संघबाधंणी करण्याची मोठी संधी होती. मात्र, विराटनं अतिप्रयोग करुन २०१९ ची आठवण करुन दिली आहे. विराट कोहली नेमकं काय शोधतोय? हेच उमगण्यापलिकडे झालं आहे. तुमच्याकडे सर्व काही परफेक्ट असताना प्रयोग का करायचं?  महत्त्वाच्या सामन्यात असे प्रयोग संघाला अडचणीत आणू शकतात याचा विचार संघ व्यवस्थापनाने केलेला दिसत नाही. विराट कोहलीनं प्रयोग करण्यापेक्षा संतुलित संघाकडे लक्ष द्यायला हवं. अन्यथा प्रयोगाच्या नादात २०१९ प्रमाणे विश्वकप हातातून निघून जाईल...


​ ​

संबंधित बातम्या