गिरीप्रेमीतर्फे अन्नपूर्णा शिखरावर निघाली भारतातील पहिली नागरी मोहिम
आतापर्यंत किती जणांनी यश मिळविले याचा विचार न करता तुम्ही जिद्दीने जावे आणि मोहीम यशस्वी करून परतावे. तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि त्यानंतर आपण इथेच या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भेटणार याची मला खात्री आहे.
पुणे : अशक्य हा शब्द सैनिकाच्या शब्दकोशात नसतो. कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते असा दृढ विश्वास तो ठेवतो. तुम्हा गिर्यारोहकांनीही असाच दृष्टिकोन ठेवावा. तुमच्या निर्धारामुळे तसेच पूर्वतयारीमुळे अन्नपूर्णा मोहिमेच्या यशाचा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन पुणे विभागाचे प्रमुख ब्रिगेडीयर सुनील लिमये यांनी केले.
गिरीप्रेमीच्या माऊंट अन्नपुर्णा-1 या आठव्या अष्टहजारी मोहिमेचा ध्वजप्रदान समारंभ त्यांच्याहस्ते घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडला. मोहिमेचा नेता उमेश झिरपे, रामचंद्र राव, विद्या व्हॅली स्कुलचे विवेक गुप्ता, नलिनी सेनगुप्ता, क्युबिक्स मायक्रोसिस्टीम्सचे प्रमुख विजय जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
उमेशने आपल्या भाषणात सांगितले होते की, अन्नपूर्णा हे सर्वप्रथम सर झालेले अष्टहजारी शिखर असले तरी ते आतापर्यंत केवळ 230 जणांना सर करता आले आहे. आम्ही अनुभवी व तरुण गिर्यारोहकांचा समतोल साधत पथक तयार केले आहे. सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.
यासंदर्भात ब्रिगेडीयर लिमये म्हणाले की, आतापर्यंत किती जणांनी यश मिळविले याचा विचार न करता तुम्ही जिद्दीने जावे आणि मोहीम यशस्वी करून परतावे. तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि त्यानंतर आपण इथेच या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भेटणार याची मला खात्री आहे.
ब्रिगेडीयर लिमये यांच्याहस्ते उमेशसह एव्हरेस्टवीर आशिष माने, एव्हरेस्टवीर भुषण हर्षे आणि जितेंद्र गवारे यांना मोहीमेसाठी तिरंगा प्रदान करण्यात आला.
नलीनी सेनगुप्ता म्हणाल्या की, गिरीप्रेमीची कामगिरी आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांची नवी पिढी शाळेत घडते आहे. विद्यार्थ्यांसाठी योजनाबदद्ध उपक्रम सुरु आहेत.
विजय जोशी यांनी सांगितले की, गिर्यारोहक हा परिपूर्ण नागरीक असतो. तो देशाची सुजाण पिढी घडवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने गिर्यारोहण शिकायला हवे.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच मोहिमेचा मोहिमेचा प्रोमो व्हिडिओ दाखविण्यात आला. 8091 मीटर उंची असलेल्या या शिखराची, सहभागी गिर्यारोहकांची माहिती देणाऱ्या केवळ सहा मिनिटांच्या चित्रफितीने उपस्थित भारावून गेले आणि कार्यक्रमाची वातावरणनिर्मीती झाली.
याप्रसंगी आगामी काळातील इतर विविध मोहीमांमधील सहभागी गिर्यारोहकांनाही ध्वजप्रदान करण्यात आले. उदयोन्मुख गिर्यारोहक दिनेश कोतकर याला एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वज देण्यात आला. माऊंट चुलू फार इस्ट (उंची 6091 मीटर) ट्रेकिंग मोहिमेतील रोहिणी उपासनी, तेजा पलसोडकर, मुजाहीर संत्रामपुरवाला, संतोष कोठारे यांनी ध्वज स्विकारला.
माऊंट मेरा (उंटी 6400 मीटर) मोहिमेतील मनिष पारीख, अखिल काटकर आणि अभिराम आपटे यांना ध्वज प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मदनगड कातळारोहण मोहिमेचा व्हिडिओ दाखविण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक एव्हरेस्टवीर रुपेश खोपडे, तर आभार प्रदर्शन एव्हरेस्टवीर गणेश मोरे याने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
बाबासाहेब पुरंदरे यांचा खास संदेश
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा चित्रीत केलेल्या संदेश सभागृहात दाखविण्यात आला. त्यात ते म्हणाले की, हिमालय हा तुम्हा गिर्यारोहक मंडळींच्याच नव्हे तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी लेखक, कवी सुद्धा उत्तुंग कामगिरीला हिमालयाची उपमा देतात. अन्नपुर्णा शिखरालाही इतिहास आहे. अजून एका यशासाठी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुम्ही हसतमुखाने जा आणि मोहिम सुरक्षितपणे पूर्ण करून सुखरुप परत या. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा तिपटीने लहान असला तरी मला तुमचा आदर वाटतो. याचे कारण तुमची कामगिरी भव्य-दिव्य आहे. तुम्हाला माझा सलाम आहे. तुमच्या यशानंतर मी स्वागताला तुळस, बेल, फुले घेऊन येईन.