जयपूरचे रॉबिन झेवियर यांना ‘फुटबॉल भूषण’ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 June 2019

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे.

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील प्रतिभावंत खेळाडूचा पुरस्कारासाठी कोल्हापूरच्या कुणाल चव्हाणची निवड झाली.

यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून शनिवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता शाहू सभागृहात याचे वितरण होणार असल्याचे अध्यक्ष संभाजीराव शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर यांनी सांगितले.

फुटबॉलच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून हा अखिल भारतीय स्तरावर पुरस्कार दिला जातो. रोख ११ हजार रुपये, स्मृती करंडक आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. झेवियर हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सामना निरीक्षक म्हणून काम पाहतात. आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धा, इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लीग (आय लीग) या भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च स्पर्धात त्यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम केले आहे. राजस्थान राज्य फुटबॉल संघटनेचे सहसचिव म्हणून ते कार्यरत आहेत. जयपुर फुटबॉल क्‍लब या व्यावसायिक संघाचे सीईओ म्हणूनही गेल्या दहा वर्षापासून काम पाहतात. व्यवस्थापनामधील पदव्युत्तर शिक्षण (एमबीए) त्यांनी पूर्ण केले आहे. 

जीवनगौरव पुरस्कार यंदा पुसदच्या चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९७१ पासून ४७ वर्षे अखिल भारतीय स्पर्धांचे आयोजन या मंडळाने केले. दादा आहले, ए. डी. खान, यशवंत पांडे, इदिस खान, दयाशंकर पांडे आणि सहकाऱ्यांनी आपल्या संघातील सहकारी भैया राजे यांच्या स्मरणार्थ चिकाटीने या स्पर्धा भरविल्या. या स्पर्धेमुळे फुटबॉल रुजण्यासह संघाना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूलचा कुणाल चव्हाण प्रतिभावंत खेळाडूचा मानकरी ठरला आहे. सहा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे त्याने चौफेर खेळ करून लक्षवेधी कामगिरी केली आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या