आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मुंबई, पुण्यातच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे संयोजन पूर्णपणे जैवसुरक्षित वातावरणात होण्यासाठीच ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासाठी मर्यादित असेल, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. मूळ कार्यक्रमानुसार स्पर्धेतील लढती नवी मुंबई, भुवनेश्वर आणि अहमदाबादला होणार होत्या.

मुंबई - आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे संयोजन पूर्णपणे जैवसुरक्षित वातावरणात होण्यासाठीच ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासाठी मर्यादित असेल, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. मूळ कार्यक्रमानुसार स्पर्धेतील लढती नवी मुंबई, भुवनेश्वर आणि अहमदाबादला होणार होत्या. 

कोरोना महामारीमुळे स्पर्धा संयोजनात अनेक बदल करावे लागत आहेत. ही स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात घेण्यासाठी स्पर्धेतील लढती होणारी ठिकाणे एकमेकांच्या नजीक असण्याची गरज होती. मुंबई (फुटबॉल एरिना), नवी मुंबई (डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम) तसेच पुणे (बालेवाडी) एकमेकांच्या नजीक आहेत. तिथे यापूर्वी आंतरराष्ट्रीय लढती झाल्या आहेत. त्यामुळे या तीन ठिकाणांची निवड केली आहे, असे पटेल यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सरकारने या स्पर्धेसाठी सर्व साह्य करण्याची ग्वाही दिली आहे, असे सांगताना पटेल यांनी ओडिशा तसेच गुजरात सरकारचे आभार मानले. या दोन्ही राज्यातील सरकारने स्पर्धा संयोजनाची पूर्वतयारी केली होती. आता आम्ही नव्याने स्पर्धा पूर्वतयारी झाली आहे. आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे सुरक्षित संयोजन होईल, याची आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

जपान, ऑस्ट्रेलिया, चीन तसेच यजमान भारत यांचा सहभाग निश्चित आहे. उर्वरित आठ स्थानांसाठी सप्टेंबरपासून पात्रता स्पर्धा होईल. 


​ ​

संबंधित बातम्या