प्रशिक्षकांच्या हस्तांतरासाठी बायर्नने मोजले ३ कोटी युरो

पीटीआय
Wednesday, 28 April 2021

जर्मनीतील लीगमध्ये अव्वल असलेल्या बायर्न म्युनिचने मार्गदर्शक ज्यूलियन नॅग्लेसमन यांच्या हस्तांतरासाठी आरबी लैपझिगला तीन कोटी युरो (सुमारे २७० कोटी रुपये) मोजल्याचे समजते.

अवघ्या ३३ वर्षीय ज्यूलियन नॅग्लेसमन यांच्यासाठी चढाओढ, टॉटनहॅमही उत्सुक
बर्लिन - जर्मनीतील लीगमध्ये अव्वल असलेल्या बायर्न म्युनिचने मार्गदर्शक ज्यूलियन नॅग्लेसमन यांच्या हस्तांतरासाठी आरबी लैपझिगला तीन कोटी युरो (सुमारे २७० कोटी रुपये) मोजल्याचे समजते. नॅग्लेसमन हे अवघे ३३ वर्षांचे आहेत. त्यांच्या खरेदीसाठी प्रीमियर लीगमधील टॉटनहॅमही उत्सुक होते, पण बायर्नने बाजी मारली.

बायर्नचे सध्याचे मार्गदर्शक हॅन्सी फ्लिक यांनी मोसमाअखेर संघाचा निरोप घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे संघाच्या व्यवस्थापनासह वाद झाल्याची चर्चा आहे, पण फ्लिक हे जोशीम लोव यांच्या जागी जर्मनीचे मार्गदर्शक होणार असल्याचे समजते. त्यामुळे बायर्नने त्यांना मुदत संपण्यापूर्वी दोन वर्षे सहज मुक्त केले असेही सांगितले जात आहे.

नॅग्लेसमन यांचा लैपझिगबरोबरील करार २०२३ पर्यत होता. हा करार मध्यावरच रद्द करून बाहेर निघण्याची नॅग्लेसमन यांना फारशी संधीही नव्हती; मात्र काही आठवड्यांपूर्वी बायर्नने याबाबत चर्चा सुरू करण्यास नॅग्लेसमन यांना सांगितले होते. काही आठवड्यांपूर्वी जर्मन लीग विजेतेपदाच्या शर्यतीत बायर्नला हादरा दिलेल्या लैपझिगने अर्थातच भरपाईची मागणी केली. ही मागणी नेमकी किती याबाबत जर्मनीतील माध्यमात मतभेद आहेत, पण तीन कोटी युरो बायर्नने मोजले असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, बायर्नने मार्गदर्शकांच्या हस्तांतरासाठी मोजलेली ही सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी यापूर्वी एनत्राश्त फ्रँकफर्टला निको कोवाक यांच्यासाठी २२ लाख युरो दिले होते. याच कोवाक यांच्या हकालपट्टीनंतर फ्लिक यांच्याकडे नोव्हेंबर २०१९ मध्ये सूत्रे सोपवण्यात आली होती. त्या वेळी सहायक मार्गदर्शक पदावरून फ्लिक यांना बढती देण्यात आली होती. व्यावसायिक फुटबॉलचा विचार केल्यास चेल्सीने आंद्रे विलास बोए यांच्यासाठी पोर्तो संघास मोजलेले दीड कोटी युरो सर्वाधिक रक्कम मानली जात होती, पण बायर्नने या सर्वांना मागे टाकले.

कोण आहेत नॅग्लेसमन

  • पदार्पणाच्या मोसमात लैपझिगच्या १९ वर्षांखालील संघास विजेतेपद मिळवून दिले 
  • लैपझिगच्या वरिष्ठ संघाची चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक
  • हौफेनहैईम या फारशा चर्चेत नसलेल्या संघास चॅम्पियन्स लीगमध्ये प्रवेश मिळवून दिला
  • संघात असलेल्या खेळाडूनुसार व्यूहरचना बदलण्यात वाकबगार
  • क्लबच्या नवोदितांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात हातखंडा

​ ​

संबंधित बातम्या