जेतेपदासाठी संघर्ष संपला; पुन्हा मैत्रीचे धागे घट्ट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय स्पर्धांत करंडक उंचावण्याची दीर्घ प्रतीक्षा संपली, पण त्याचा बार्सिलोना संघातील माजी सहकारी नेमारची कायम राहिली.

साओ पावलो - लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय स्पर्धांत करंडक उंचावण्याची दीर्घ प्रतीक्षा संपली, पण त्याचा बार्सिलोना संघातील माजी सहकारी नेमारची कायम राहिली. ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीस नेमार वि. मेस्सीच असे समजले जात होते. फुटबॉलच्या मैदानावरील संघर्ष संपल्यावर खेळाडूत मैत्री असते, हेच या दोघांनी दाखवून दिले.

मेस्सीसह अर्जेंटिना संघ २८ वर्षांचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपवल्याचा आनंद साजरा करीत होता. त्याचवेळी घरच्या मैदानावर पराजित झाल्याचे दुःख ब्राझील संघास अनावर झाले होते. नेमारला अश्रू आवरत नव्हते. नेमार स्वतःला सावरत मेस्सीचे अभिनंदन करण्यासाठी अर्जेंटिना संघाच्या दिशेने गेला. मेस्सीने ते पाहिले आणि त्याने लगेच येऊन नेमारला आलिंगन दिले. बार्सिलोनाचा स्टार खेळाडू मेस्सी आपल्या माजी सहकाऱ्याचे पराभवाबद्दल सांत्वन करीत होता. मात्र त्यातही लक्षवेधक ठरले ते मेस्सीचे कृत्य.

विजयाने बेभान झालेल्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे एकमेकांना आलिंगन दिलेल्या मेस्सी - नेमारकडे लक्षच नव्हते. अर्जेंटिनाचे खेळाडू आपल्या जवळ विषेशतः नेमारजवळ येत आहेत, हे पाहून त्यांना नेमारपासून रोखण्यासाठी हात पुढे केला. त्याचे फुटबॉल जगतात तसेच समाज माध्यमांवर कौतुक झाले.

मेस्सी वि. नेमार

  • अर्जेंटिना तसेच ब्राझीलचे स्पर्धेत प्रत्येकी १२ गोल
  • मेस्सीचे स्पर्धेत चार गोल तसेच पाच गोलना साह्य, तर नेमारचे दोन गोल आणि तीन गोलसाठी साह्य

​ ​

संबंधित बातम्या