चेल्सीचा चॅम्पियन धमाका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

चमकदार मोसमाची सांगता चॅम्पियन्स फुटबॉल लीग विजेतेपदाने करण्याचे मँचेस्टर युनायटेडचे स्वप्न चेल्सीने भंग केले. काई हॅवेर्तझ याने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने सिटीला १-० असे पराजित करीत  दुसऱ्यांदा चॅम्पियन्स विजेतेपद जिंकले.

क्रिकेट पोर्तो - चमकदार मोसमाची सांगता चॅम्पियन्स फुटबॉल लीग विजेतेपदाने करण्याचे मँचेस्टर युनायटेडचे स्वप्न चेल्सीने भंग केले. काई हॅवेर्तझ याने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने सिटीला १-० असे पराजित करीत  दुसऱ्यांदा चॅम्पियन्स विजेतेपद जिंकले.

जर्मनीच्या हॅवेर्तझने आपल्यासाठी ७ कोटी पौंड देण्याचा निर्णय योग्य होता हे मोसमातील अखेरच्या सामन्यात दाखवले. त्याने सिटीच्या गोलरक्षकास छान गुगारा दिला आणि गोलपोस्टमध्ये सहज चेंडू मारला. सिटीला संभाव्य विजेते मानले जात होते; पण त्यांचे मार्गदर्शक पेप गॉर्डिआला यांनी संघात केलेले बदल तसेच खेळाडूंच्या बदललेल्या जागांनी त्यांची वाटचाल खडतर केली. बार्सिलोनास २०११ मध्ये चॅम्पियन्स विजेते केल्यानंतर गॉर्डिआला सिटीकडे आले; पण चॅम्पियन्स लीग त्यांना त्यानंतर दुरावतच आहे. 

गतस्पर्धेतील उपविजेत्या पीएसजीचे मार्गदर्शक थॉसम टशेल यांनी चेल्सीला विजेते केले. सिटीच्या विस्कळित बचावाचा फायदा घेत चेल्सीने आक्रमणे केली; पण त्यात लय नव्हती. त्यातच विश्रांतीस सहा मिनिटे असताना चेल्सीचा अनुभवी सेंटर बॅक थिएगो सिल्वा जखमी झाला. यामुळे सिटीची बाजू सरस झाली, असे वाटत होते; पण तीन मिनिटांतच निर्णायक गोल झाला. 

लक्षवेधक

  • चॅम्पियन्स लीग दोनदा जिंकणारा चेल्सी हा प्रीमियर लीगमधील दुसरा संघ. यापूर्वी लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड
  • सातपैकी सहा युरोपियन स्पर्धेत चेल्सी विजयी, त्यातील चार विजेतेपदे रोमन अब्राहिमोविच प्रमुख झाल्यानंतर
  • मार्गदर्शक पेप गॉर्डिआला यांची चेल्सीविरुद्ध सलग तिसरी हार
  • जर्मन मार्गदर्शकांची चॅम्पियन्स हॅट््ट्रिक. यापूर्वी जर्गन क्लॉप (२०१९), हॅन्सी फ्लिक (२०२०)
  • सिटीचे मार्गदर्शक असताना गॉर्डिआला प्रथमच अंतिम सामन्यात पराजित

पाच महिन्यात झिरोचे हिरो
चॅम्पियन्स लीग विजेतेपद दुरावल्यानंतर पीएसजीने थॉमस टशेल यांची हकालपट्टी केली. त्याच सुमारास चेल्सी नव्या मार्गदर्शकाच्या शोधात होते. चेल्सी प्रीमियर लीगमध्ये नवव्या क्रमांकावर गेल्यामुळे फ्रँक लॅम्पार्ड यांची गच्छंती करण्यात आली. २२ कोटी पौंड खर्ची केल्यानंतर पीछेहाट झाल्याने व्यवस्थापन चिडले होते. लॅम्पार्ड यांच्याऐवजी टशेल यांच्याकडे दीड वर्षासाठी सूत्रे सोपवण्यात आली, त्या वेळी ते किती महिन्यासाठी राहतील, अशीच चर्चा होती. चेल्सीच प्रमुख असलेल्या रोमन अब्राहिमोविच यांनी टशेल यांची भेटही घेतली नव्हती. लॅम्पार्ड यांनी हॅवेर्तझ याच्या खरेदीसाठी दिलेले ७ कोटी पौंड चेल्सी संघव्यवस्थापनास जास्त वाटत होते. टशेल यांनी त्यालाही हिरो केले.


​ ​

संबंधित बातम्या