चेल्सीची रेयालविरुद्ध हुकूमत कायम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 May 2021

चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील परतीच्या लढतीत घरच्या मैदानावर रेयाल माद्रिदचा २-० असा पराभव केला आणि ३-१ अशा एकत्रित वर्चस्वासह अंतिम फेरीत प्रवेश केला.

इंग्लंडमधील दोन संघांत रंगणार चॅम्पियन्स लीगची अंतिम लढत
लंडन - चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील परतीच्या लढतीत घरच्या मैदानावर रेयाल माद्रिदचा २-० असा पराभव केला आणि ३-१ अशा एकत्रित वर्चस्वासह अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या लढतीत अवे गोल करून चेल्सीने वर्चस्व मिळवले होते. तेच वर्चस्व घरच्या मैदानावर कायम राखले.

रेयाल माद्रिदने जोरदार सुरवात केली होती, पण करीम बेनझेमाने रचलेली दोन आक्रमणे चेल्सीचा गोलरक्षक एदुआर्द मेंडी याने विफल ठरवली. परतीची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्यास चेल्सी अवे गोलच्या जोरावर बाजी मारणार हे रेयाल जाणून होते. गोल होत नसल्याने ते काहीसे निराश झाले. त्याचाच फायदा घेत चेल्सीने आक्रमणाची तीव्रता वाढवली. टिमो वेर्नरने हेडरवर अप्रतिम गोल करीत गोलशून्य कोंडी फोडली. रेयालने जोरदार प्रतिआक्रमणे सुरू केली. त्यांचा गोलरक्षकही भक्कम होता. पाच मिनिटे असताना माऊंटने दुसरा गोल करीत रेयालचा प्रतिकार अखेर शांत केला.

चेल्सीची ही अंतिम फेरीतील वाटचाल धक्कादायक आहे. त्यांची डिसेंबरच्या अखेरीस प्रीमियर लीगमध्येही पीछेहाट झाली होती, पण जानेवारीत फ्रँक लॅम्पार्ड यांच्याऐवजी थॉमस टशल आले. गतस्पर्धेत उपविजेत्या पीएसजीचे ते मार्गदर्शक होते. त्यामुळे टशल मार्गदर्शन करीत असलेल्या संघाने सलग दुसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.


​ ​

संबंधित बातम्या