एरिक्सन अद्याप रुग्णालयात, प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

फिनलंडविरुद्धच्या युरो फुटबॉल स्पर्धेतील लढतीच्यावेळी मैदानात पडलेल्या ख्रिस्तियन एरिक्सन अद्यापही रुग्णालयात आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने डेन्मार्क संघातील सहकाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

कोपेनहेगन - फिनलंडविरुद्धच्या युरो फुटबॉल स्पर्धेतील लढतीच्यावेळी मैदानात पडलेल्या ख्रिस्तियन एरिक्सन अद्यापही रुग्णालयात आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने डेन्मार्क संघातील सहकाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मैदानावर पडलेल्या एरिक्सनवर लगेच प्रथमोपचार झाले. त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अजून चाचण्या होणार आहेत. ख्रिस्तियनसह आमचे बोलणे झाले आहे, असे डेन्मार्क संघटनेने सांगितले. 
पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास डेन्मार्कला थ्रो इन लाभला. त्यावेळी डेन्मार्कच्या खेळाडूने चेंडू एरिक्सनकडे फेकला, त्यावर ताबा घेत असताना एरिकसन पडला. त्यावेळी तो श्वास घेत होता, त्याची नाडीही लागत होती. पण लगेच परिस्थिती बदलली. कृत्रिम श्वास देण्यात आला आणि रुग्णालयात नेण्यात आले, असे डेन्मार्क संघाचे डॉक्टर मार्टीन बोएसेन यांनी सांगितले.

एरिक्सनने रुग्णालयात नेताना डोळे उघडले होते, असे सांगितल्यावरच डेन्मार्क संघ उर्वरित लढतीसाठी मैदानात आला. संघातील सर्वच खेळाडूंची मनःस्थिती चांगली नव्हती. त्यातील काही खेळण्यास तयार नव्हते, असे डेन्मार्कचे मार्गदर्शक कॅस्पर हिलमांड यांनी सांगितले. 

हात हलवतानाच्या छायाचित्रामुळे
डेन्मार्कची हार, पण जीवन जिंकले हे वर्तमानपत्राचे शीर्षक डेन्मार्कमधील भावना व्यक्त करणारे आहे.  खेळात वेगवान नियोजनबद्ध चाली तसेच समन्वय आवश्यक असतो, हेच घडल्यामुळे एरिक्सन वाचल्याची भावना आहे. मैदानाबाहेर स्ट्रेचरवरून नेत असताना एरिकसनने हात हलवला असल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर आले आणि त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला.

एरिक्सनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. तो आपल्यातून त्यावेळी नेमका किती दूर गेला होता हे सांगणे अवघड आहे, पण मैदानावरील योग्य प्रथमोपचारामुळे त्याचा जीव वाचला आहे. हे का घडले हे आत्ता सांगता येणे अवघड आहे. आत्तापर्यंतचे चाचण्याचे अहवाल समाधानकारक आहेत.
- मार्टीन बोएसेन, डेन्मार्क संघाचे डॉक्टर

एरिक्सन पडल्यानंतर

  • एरिक्सनला पडलेला बघितल्यावर डेन्मार्क कर्णधार सायमन कॅजेर याने त्याला श्वास घेण्यास मदत केली.
  • एरिक्सन गंभीर आहे हे लक्षात आल्यावर प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंचे त्याला मैदानाबाहेर घेऊन जाईपर्यंत कडे केले.
  • एरिक्सनला मैदानाबाहेर नेल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांनी शांतता राखली. चाहत्यांकडून ख्रिस्तियन एरिक्सनचा गजर
  • एरिक्सनची प्रकृती स्थिर आहे समजल्यानंतर दोन तासांनी लढत सुरू

​ ​

संबंधित बातम्या