विक्रमी लढतीत मेस्सीची चमक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाकडून सर्वाधिक १४८ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा विक्रम संस्मरणीय केला. त्याने चमकदार कामगिरीस दोन गोलांची झळाळी देत अर्जेंटिनास कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियाविरुद्ध ४-१ असे विजयी केले.

साओ पावलो - लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाकडून सर्वाधिक १४८ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा विक्रम संस्मरणीय केला. त्याने चमकदार कामगिरीस दोन गोलांची झळाळी देत अर्जेंटिनास कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियाविरुद्ध ४-१ असे विजयी केले.

विक्रमी सामन्याबद्दल अभिनंदन स्वीकारल्यानंतर मेस्सीने त्याच्या खास शैलीत खेळास सुरुवात केली. त्याच्या अचूक पासवर ॲलजेंद्रो गोमेझने अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर मेस्सीने ३३ व्या मिनिटास पेनल्टी सत्कारणी लावली; तसेच सर्जिओ ॲग्युएराच्या प्रभावी पासवर सुरेख गोल करीत अर्जेंटिनास विश्रांतीस ३-० आघाडीवर नेले. मेस्सी आता पाऊणशतकी गोलांच्या टप्प्याचा आनंद उत्तरार्धात साजरा करणार अशीच अपेक्षा होती. 

पूर्वार्धात काहीसा विस्कळित असलेला बोलिव्हियाचा बचाव उत्तरार्धात सुधारला. त्यांनी चांगली प्रतिआक्रमणे करीत अर्जेंटिनाच्या बचावफळीवर दडपण आणले. कार्लोस लॅम्पे मेस्सी तसेच त्याच्या सहकाऱ्यांना गोलपासून रोखू लागला; मात्र अखेर अर्जेंटिनाने सलग १७ सामन्यात अपराजित राहण्याची मालिका कायम राखली. 

उपांत्यपूर्व लढती
पेरू वि. पॅराग्वे (शनिवारी पहाटे २.३०)
ब्राझील वि. चिली (शनिवारी पहाटे ५.३०)
उरुग्वे वि. कोलंबिया (रविवारी पहाटे ३.३०)
अर्जेंटिना वि. इक्वेडोर (रविवारी सकाळी ६.३०)


​ ​

संबंधित बातम्या