लबाडी करून इंग्लंडचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 July 2021

प्रमुख फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी पाच दशकांनंतर गाठल्याचा आनंद इंग्लंड संघ करीत असताना तेथील नेटकऱ्यांनी, तसेच प्रसिद्धी माध्यमांनीच आपल्या संघाचा विजय कसा लबाडीने मिळवला आहे हे दाखवले आहे.

लंडन - प्रमुख फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी पाच दशकांनंतर गाठल्याचा आनंद इंग्लंड संघ करीत असताना तेथील नेटकऱ्यांनी, तसेच प्रसिद्धी माध्यमांनीच आपल्या संघाचा विजय कसा लबाडीने मिळवला आहे हे दाखवले आहे. समाज माध्यमांवर अनेकांनी याची लकी विजय म्हणून हेटाळणीही केली आहे.

हॅरी केनने पेनल्टी किकवर केलेल्या गोलवर इंग्लंडने बाजी मारली. मात्र ही पेनल्टी किक घेण्यापूर्वी इंग्लंड प्रेक्षकांनी डेन्मार्क गोलरक्षकाच्या चेहऱ्यावर लेझर बीमने प्रकाश सोडला होता. याबाबत युरोपिय फुटबॉल महासंघाने इंग्लंड संघटनेस नोटीस दिली आहे. मात्र ही पेनल्टी किक इंग्लंडला देण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याबाबतच जास्त विचारणा होत आहे. 

स्टर्लिंगला अवैधरीत्या रोखल्याचा दावा करीत इंग्लंडने ही पेनल्टी किक मिळवली, पण स्टर्लिंगला रोखण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी मैदानात दोन चेंडू होते. त्यावेळी रेफरींनी लढत का थांबवली नाही, अशी विचारणा होत आहे. आश्चर्य म्हणजे गोलक्षेत्रात चेंडूवरील वर्चस्वासाठी चुरस होत असताना त्याच भागात दुसरा चेंडूही होता. त्यानंतर काही सेकंदातच स्टर्लिंगने पेनल्टी किक मिळवली. जागतिक महासंघाच्या नियमानुसार मैदानावर अतिरिक्त चेंडू, कोणतीही वस्तू किंवा प्राणी असल्यास रेफरींनी ताबडतोब लढत थांबवणे आवश्यक आहे. रेफरींनी लढत परत सुरू करताना चेंडू दोन खेळाडूंच्या मध्ये उडवून सुरू करणे आवश्यक असते. 

स्टर्लिंगने पेनल्टी किक मिळवली, त्यावेळी स्वतःहून झेप घेतल्याचेच दिसत होते. त्याला कोणीही फारसा धक्का दिला नव्हता. आश्चर्य म्हणजे व्हिडीओ रेफरींनीही हा क्षण कॅमेऱ्याच्या सर्व अँगलमधून न बघताच निर्णय दिला.

लेझर किरणे सोडल्याचा इंग्लंडवर आरोप 
डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर श्माईशेल याच्या दिशेने लेझर किरणे सोडल्याचा आरोप युरोपिय महासंघाने इंग्लंडवर ठेवला आहे. जादा वेळेत केन पेनल्टी घेण्यापूर्वी काही क्षण श्माईशेल याच्या चेहऱ्यावर लेझर सोडले असल्याचे दूरचित्रवाणी कॅमेऱ्याने टिपले. त्याचबरोबर सामन्यापूर्वी डेन्मार्कचे राष्ट्रगीत वाजवले जात असताना त्यात व्यत्यय आल्याबद्दलही इंग्लंडवर आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत युरोपिय महासंघाची समिती चौकशी करणार आहे. लेझर सोडल्याबद्दल इंग्लंडला आठ हजार पौंडचा दंड होऊ शकेल.


​ ​

संबंधित बातम्या