स्वयंगोल जर्मनीच्या मुळावर; वर्ल्डकप विजेत्या फ्रान्सची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 June 2021

आंतरराष्ट्रीय अव्वल संघातील ताकद दाखवण्यासाठी काही वर्षांपासून झगडत असलेल्या जर्मनीने जगजेत्या फ्रान्सचा कस पाहिला, पण अखेर मॅटस् हमेल्स याच्या स्वयंगोलामुळे फ्रान्सने युरो फुटबॉल स्पर्धेतील लढत जिंकली.

म्युनिच - आंतरराष्ट्रीय अव्वल संघातील ताकद दाखवण्यासाठी काही वर्षांपासून झगडत असलेल्या जर्मनीने जगजेत्या फ्रान्सचा कस पाहिला, पण अखेर मॅटस् हमेल्स याच्या स्वयंगोलामुळे फ्रान्सने युरो फुटबॉल स्पर्धेतील लढत जिंकली. 

दोन वर्षापूर्वी हमेल्स याला जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा निरोप घेण्यास सांगितले होते. मात्र युरो स्पर्धेत बचाव भक्कम करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. त्याने ल्युकास हर्नांडेझचा क्रॉस आपल्याच नेटमध्ये मारला आणि त्याच्याकडून सामन्यातील निर्णायक गोल झाला. फ्रान्स नक्कीच दोन संघात काहीसे सरस होते, पण जर्मनीने त्यांना दडपणाखाली ठेवले.

चेंडूवर अधिकाधिक वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांवरील दडपण वाढवण्याची जर्मनीची खासियत. त्यांनी हे साध्य केले, पण त्यांना गोल साध्य होत नव्हते. त्याचवेळी संधी मिळाल्यावर फ्रान्स अतिवेगवान आक्रमणे करीत होते. त्यात त्यांचे दोन गोल ऑफसाईडमुळे अवैध ठरवण्यात आले, तर दोन प्रयत्नात चेंडू गोलजाळ्याच्या अगदी जवळून गेला. 

लोव यांना काही वर्षांपूर्वी नकोसे असलेले खेळाडू जर्मनी संघात परतले आहेत. त्यांचा नवोदितांसह पुरेसा समन्वय नाही. मोहीम यशस्वी होत नसल्याचे पाहिल्यावर काही जर्मनी खेळाडू आक्रमक झाले. बचावपटू अँतानिओ रुदीगर हा पोग्बाला चावल्याचा आरोप झाला, मात्र टीव्ही रिप्लेत नेमके काही न दिसल्याचा फायदा रुदीगरला देण्यात आला. अर्थात लोव संघातून लुप्त होणारा आत्मविश्वास कसा आणणार हा प्रश्नच आहे.

चेंडूवर ताबा नसताना पूर्वार्धात तसेच उत्तरार्धात आमचा खेळ चांगला झाला. संघातील सर्वच खेळाडूंनी बचावात चांगली कामगिरी केली. सामन्याच्या तिसऱ्या टप्प्यात बचावाचा चांगलाच कस लागला.
- ह्युगो लॉरिस, फ्रान्सचा कर्णधार.


​ ​

संबंधित बातम्या