गोलरक्षक मार्टिनेझ अर्जेंटिनाचा हिरो

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 July 2021

अर्जेंटिना जिंकले म्हणजे लिओनेल मेस्सीच विजयाचा हिरो असणार हे समीकरण अखेर बदलले. अर्जेंटिनाचा एमिलिआनो मार्टिनेझ कोपा अमेरिका स्पर्धेपूर्वी एका महिन्यात आपण देशातील सर्वोत्तम गोलरक्षक असल्याचे दाखवले.

ब्रासालिया - अर्जेंटिना जिंकले म्हणजे लिओनेल मेस्सीच विजयाचा हिरो असणार हे समीकरण अखेर बदलले. अर्जेंटिनाचा एमिलिआनो मार्टिनेझ कोपा अमेरिका स्पर्धेपूर्वी एका महिन्यात आपण देशातील सर्वोत्तम गोलरक्षक असल्याचे दाखवले. आता त्याने कोलंबियाविरुद्ध तीन पेनल्टी शूटआउट रोखत देशास फुटबॉलमधील नवा हिरो दिला आहे. 

निर्धारित वेळेनंतर १-१ बरोबरी असल्यामुळे पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. कोपा अमेरिका स्पर्धेतील बाद फेरीच्या लढतीत अंतिम फेरीपूर्वी जादा वेळेचा अवलंब होत नाही. निर्णायक पेनल्टी शूटआउटमध्ये अॅस्टॉन व्हिलाचा गोलरक्षक असलेल्या मार्टिनेझने दाविन्सन सँचेझ, येर्री मिना आणि एडविन कार्डोना यांच्या पेनल्टी किक रोखत अर्जेंटिनास ३-२ असे विजयी केले. 

मार्टिनेझवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. मेस्सीने त्यास सुरुवात केली. पेनल्टी शूटआउटमध्ये कमालीचे आव्हान असते, मात्र आमच्याकडे एम्मी आहे. तो जबरदस्त आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास दाखवला. तो त्याने सार्थ ठरवला. स्पर्धेतील प्रत्येक सामना खेळण्याचे आमचे लक्ष्य होते, आता आम्ही अंतिम फेरी गाठली आहे, असे मेस्सी म्हणाला. निर्धारित वेळेत मार्टिनेझचा फारसा कस लागला नाही, पण त्याने पेनल्टी शूटआउटमध्ये सर्वस्व पणास लावले. 

प्रतिस्पर्ध्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी मार्टिनेझने पेनल्टी शूटआउटमध्ये सातत्याने प्रतिस्पर्ध्यांपर्यंत शेरेबाजी केली. रेफ्रींनी त्याला ताकीद दिली, पण त्याच्यासाठी संघाचा विजय मोलाचा होता. या गोलरक्षकाने व्यावसायिक स्तरावर वेगाने प्रगती केली, पण अर्जेंटिनाने त्याला पहिली संधी ३ जूनला दिली. मात्र दुसऱ्याच सामन्यात तो जखमी झाला. 

या सामन्यात तो गोलरक्षक असेपर्यंत अर्जेंटिना आघाडीवर होते, पण त्यानंतर बरोबरी स्वीकारावी लागली होती. त्यामुळे त्याला संधी देण्याचे ठरले. कोपा अमेरिका स्पर्धेच्यावेळी अर्जेंटिना संघव्यवस्थापन त्याला खेळवण्यास तयार नव्हते, पण फ्रँको अर्मानीस कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मार्टिनेझला पसंती देण्याचे ठरले. 

अशी झाली लढत
तपशील        अर्जेंटिना    कोलंबिया

चेंडूवर वर्चस्व    ५०%          ५०%
शॉटस््             १३             १४
ऑन टार्गेट          ४              ४
कॉर्नर्स               ५              ३
फाऊल्स           २०             २७

लक्षवेधक

  • अर्जेंटिनाने कोलंबियाविरुद्धच्या तीनही पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारली. यापूर्वी दोनदा हे घडल्यावर अर्जेंटिनाचे स्पर्धा विजेतेपद
  • लिओनेल स्कालोनी मार्गदर्शक झाल्यापासून अर्जेंटिनाने कोलंबियास कधीही ९० मिनिटांत हरवलेले नाही, चारपैकी तीन बरोबरी, एक पराभव
  • अर्जेंटिनाने कोलंबियाविरुद्धच्या त्रयस्थ ठिकाणच्या दहापैकी दोनच लढती जिंकल्या. पाच बरोबरी आणि ३ पराभव

​ ​

संबंधित बातम्या