स्पेनला पेनल्टी शूटआउटवर पराजित करीत इटली अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 July 2021

तीन वर्षांपूर्वी विश्वकरंडक स्पर्धेस अपात्र ठरलेले इटली आता युरो विजेतेपदापासून एक विजय दूर आहेत. उपांत्य सामन्यात त्यांनी स्पेनचा पेनल्टी शूटआउटवर ४-२ पराभव केला. अखंड आणि जादा वेळेत सामना १-१ अशा बरोबरीत राहिला होता.

लंडन - तीन वर्षांपूर्वी विश्वकरंडक स्पर्धेस अपात्र ठरलेले इटली आता युरो विजेतेपदापासून एक विजय दूर आहेत. उपांत्य सामन्यात त्यांनी स्पेनचा पेनल्टी शूटआउटवर ४-२ पराभव केला. अखंड आणि जादा वेळेत सामना १-१ अशा बरोबरीत राहिला होता. 

इटलीचा खेळ खेळ आकर्षक नसला तरी ते आपल्या जमेच्या बाजू जाणत होते, तसेच सर्वोच्च स्तरावरील यशासाठी असलेली जिद्द आणि कमालीचे दडपण असलेल्या शूटआउटमध्ये शांतपणे खेळ करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती आणि त्याच जोरावर ते यशस्वी झाले. 

रॉबर्टो मॅन्सिनी यांनी मार्गदर्शन केलेल्या इटली संघाचा अंतिम फेरी खेळण्यावर हक्क आहे, हे स्पेनही मान्य करेल. त्यांनी गेल्या ३३ सामन्यांत हार पत्करलेली नाही. ही विजयाची सवय त्यांनी उपांत्य फेरीत कायम ठेवताना नक्कीच विजय कसा मिळवता येतो हे दाखवून दिले. 

पेनल्टी शूटआउटला अनेक जण लॉटरी म्हणतात, पण त्यातील निकालाबाबत सहज अंदाज वर्तवता येत नाही. मात्र यावेळी कौशल्य महत्त्वाचे असते, पण त्यापेक्षाही प्रतिकूल परिस्थितीतील शांतपणा. पेनल्टी शूटआउटवरील पहिल्याच प्रयत्नात गोल न होऊनही इटली खचले नाहीत. त्यांनी त्यानंतरचे चारही प्रयत्न यशस्वी ठरवले. त्यातही निर्णायक क्षणी जॉर्गिन्हो याने ज्याप्रकारे शांतपणे गोल केला, ते पाहून इटली किती कणखर आहेत हेच दिसले. 
गोलरक्षक गिआनलुईगी दॉन्नारुम्माच्या साथीत इचली स्पेनला गोलपासून वंचित ठेवत, त्यांच्यावरील दडपण वाढवत होते

आम्ही आमचे स्वप्न साकार करण्यापासून एक पाऊल दूर आहोत. स्पेनचा संघ नक्कीच ताकदवान आहे, पण आमचा इटली संघ झुंजार आहे. आम्ही कधीही हार मानत नाही. 
- गिआनलुईगी दॉन्नारुम्मा, इटली गोलरक्षक.

अशी झाली लढत
तपशील    इटली    स्पेन
चेंडूवर वर्चस्व    ३५%    ६५%
यशस्वी पास    ३०६    ८३३
पास अचूकता    ७६%    ८९%
धाव (किमी)    १४५.६    १४२.०
एकूण शॉटस््    ७    १६
ऑन टार्गेट    ४    ५
कॉर्नर्स    १    ६
फाऊल्स    १७    १८
टॅकल्स    १७    १०


​ ​

संबंधित बातम्या