इटलीची भक्कम गोलरक्षणाची परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 July 2021

गिगी ते गिगिओ... इटलीचे अभेद्य गोलरक्षण कायम आहे. १५ वर्षांपूर्वी गिआनलुईगी बफॉन याने इटलीस पेनल्टी शूटआऊटवर विश्वकरंडक जिंकून दिला होता. आता गिआनलुईगी दोन्नारुम्मा याने युरो विजेतेपद जिंकून दिले.

लंडन - गिगी ते गिगिओ... इटलीचे अभेद्य गोलरक्षण कायम आहे. १५ वर्षांपूर्वी गिआनलुईगी बफॉन याने इटलीस पेनल्टी शूटआऊटवर विश्वकरंडक जिंकून दिला होता. आता गिआनलुईगी दोन्नारुम्मा याने युरो विजेतेपद जिंकून दिले.

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन्नारुम्मा याने दोन किक रोखल्या; तर एक किक सदोष होती. दुसऱ्या मिनिटास गोल स्वीकारावा लागल्यानंतरही इटली संघाचा दोन्नारुम्मावरील विश्वास कमी झाला नव्हता. २२ वर्षीय दोन्नारुम्मा गतमोसमापर्यंत मिलानसह करारबद्ध होता. आता त्याला खरेदी करण्याची प्रक्रिया पीएसजीने अंतिम टप्प्यात आणली असल्याची चर्चा आहे.

माझी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली, पण त्याचे श्रेय लिओनार्दो बॉनुस्सी आणि जिओर्जिओ चिएलीनी यांनाही तेवढेच आहे, असे दोन्नारुम्माने सांगितले. सुरुवातीस गोल स्वीकारावा लागल्याने कोणताही संघ खचला असता, पण आम्ही सहज हार मानत नाही आणि मानणारही नाही असे तो म्हणाला.

बफॉनपेक्षा दोन्नारुम्माची कामगिरी जास्त प्रभावी आहे. २००६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत फ्रान्स आक्रमकाची किक क्रॉस बारवर लागल्याने इटली जिंकले होते; तर दोन्नारुम्माने दोन किक रोखल्या होत्या. दोन्नारुम्मा एसी मिलानकडून पहिल्यांदा खेळला त्या वेळी त्याचे वय १६ वर्षे ८ महिने होते. त्याला कायम बफॉनचा वारसदार मानले जात होते. त्याला पहिल्यांदा संधी २०१६ मध्ये फ्रान्सविरुद्ध उत्तरार्धात देण्यात आली. त्या सामन्यात इटली १-३ हरले होते, पण दुसऱ्या सामन्यात त्याने जर्मनीविरुद्ध एकही गोल स्वीकारला नाही.

इटलीकडून ३० लढती खेळलेल्या दोन्नारुम्माने बहुतेक सामन्यात गोल स्वीकारलेला नाही. इटलीने एक हजार १६८ मिनिटे प्रतिस्पर्ध्यांना गोलपासून रोखले. त्यात दोन्नारुम्माचा वाटा मोलाचा होता. दोन्नारुम्मासारखा गोलरक्षक असणे हे नशिबाची साथ असल्यासारखेच आहे. तो शूटआऊटमध्ये एखाद्‍ दोन पेनल्टी रोखणार हा आम्हाला विश्वास होता, असे मॅन्सीनी यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या