इटली जोमात...इंग्लंड कोमात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 July 2021

युरो फुटबॉलची अंतिम लढत सुरू होण्यास अर्धा पाऊण तास असताना इंग्लंडचे चाहते फुटबॉल इज कमिंग होम, असे गात स्टेडियमच्या एका स्टँडमध्ये असलेल्या चाहत्यांना चिडवत होते. त्यास इटलीचे चाहते फुटबॉल इज कमिंग रोमने उत्तर देत होते.

इंग्लंडच्या सर्व योजना पद्धतशीरपणे मोडून काढण्यात इटलीला यश
लंडन - युरो फुटबॉलची अंतिम लढत सुरू होण्यास अर्धा पाऊण तास असताना इंग्लंडचे चाहते फुटबॉल इज कमिंग होम, असे गात स्टेडियमच्या एका स्टँडमध्ये असलेल्या चाहत्यांना चिडवत होते. त्यास इटलीचे चाहते फुटबॉल इज कमिंग रोमने उत्तर देत होते. सामना संपल्यानंतर काही मिनिटांनी फुटबॉल इज कमिंग रोम सुरू होते आणि फुटबॉल इज कमिंग होम कधीच लुप्त झाले होते. इटलीने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराजित करीत युरो फुटबॉल स्पर्धा जिंकली हे समजण्यासाठी गोलफलक बघण्याची गरज नव्हती.

इटलीच्या चाहत्यांचा जल्लोष पाहून इंग्लंड संघातील खेळाडू, मार्गदर्शक गेराथ साऊथगेट आणि चाहत्यांना पराभवाच्या डागण्या जास्त बसत होत्या. गेली काही वर्षे पाहिलेल्या स्वप्नाचा भंग त्यांना बघावा लागत होता. पेनल्टी शूटआऊटने इंग्लंडला शूटआऊट केले होते. १९ वर्षीय बुकायो साका हा अखेरच्या पेनल्टीवर गोल करून इंग्लंडचे आव्हान कायम राखण्यास अपयशी ठरला होता. कोणत्याही क्लबसह करारबद्ध नसलेला इटलीचा गोलरक्षक गिआनुईगी दोन्नारुम्मा त्याच्यापेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठा होता, पण त्याची इटलीला विजेते करण्याची जिगर, भूक जास्त होती.

इंग्लंडसाठी सर्वच काही धक्कादायक होते. सामन्यापूर्वी इंग्लंडमध्ये सर्व रस्ते वेम्बले स्टेडियमकडे जात होते. ल्युक शॉ याने दुसऱ्याच मिनिटास गोल केला, त्या वेळी विजेतेपदाचा ५५ वर्षांचा दुष्काळ संपणार असेच वाटत होते, पण तीन वर्षांपूर्वी विश्वकरंडक पात्रताही साध्य झाली नाही, त्याची भरपाई करण्यासाठी आतुर असलेले इटलीचे खेळाडू एकमेकांना साथ देत, शांतपणे इंग्लंडचा बचाव पोखरत होते. प्रतिकूल निर्णय गेल्यावर एकमेकांना प्रोत्साहित करीत होते.

काय सांगावे, कदाचित इंग्लंडने काय होणार याचे संकेत ओळखले नसावेत. सामन्यापूर्वी उत्साहात नाचणाऱ्या इंग्लंड चाहत्यांवर अचानक दाटून आलेल्या ढगातून पाऊस सुरू झाला. इटलीचे मार्गदर्शक रॉबर्टो मॅन्सिनी यांनी तातडीने वॉटरप्रूफ जॅकेट परिधान केले. कदाचित शॉच्या गोलनंतर इंग्लंडला हेच घडल्याचा अनुभव आला. सुरुवातीस विस्कळित असलेला इटलीचा बचाव कडवा आणि अभेद्य होत गेला. २० हजार दिवसांची विजेतेपदाची प्रतीक्षा वाढणार असे दिसू लागले.

मैदानातील चाहत जॅक ग्रिलिशला खेळवण्यासाठी आग्रह धरत त्याला मैदानात उतरवण्यासाठी ९९ मिनिटे प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. बॉनुस्सी आणि जिओर्जिओ चिएलीनी या एकत्रित ७० वर्षे वय असलेल्या खेळाडूंचा बचाव भेदणे इंग्लंडला अवघड जात होते. हे काम ग्रिलिशने केले असते, असा दावा आता होत आहे. 

लक्षवेधक

 • इटलीचे हे सहावे प्रमुख विजेतेपद. चारदा विश्वकरंडक आणि दोनदा युरो. जर्मनीच (७) यात आघाडीवर
 • एकही गोलची संधी निर्माण करण्यात हॅरी केन अपयशी
 • इटलीचा गोलरक्षक गिआनुईगी दोन्नारुम्मा स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवलेला पहिला गोलरक्षक
 • पाचही पेनल्टी शूटआऊट जिंकण्याचा दोन्नारुम्माचा पराक्रम. तीन क्लब संघासाठी तर दोन इटलीसाठी
 • इटलीचे स्पर्धेत १३ गोल. एका स्पर्धेतील हे सर्वाधिक. मात्र फ्रान्सचा (१९८४) विक्रम मोडण्यापासून दूर
 • एका स्पर्घेत दोन पेनल्टी शूटआऊट जिंकण्याची ही इटलीची पहिलीच वेळ
 • ल्युक शॉने युरोपिय स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील (१.५७ मिनीट) सर्वात वेगवान गोल
 • पेनल्टी शूटआऊटवर निर्णय झालेली ही केवळ दुसरी युरो अंतिम लढत. १९७६ मध्ये चेकोस्लोवाकियाने याप्रकारे विजेतेपद जिंकले होते
 • इंग्लंडने संपूर्ण सामन्यात गोलच्या तीनच संधी निर्माण केल्या, यापूर्वी ग्रीस २००४ च्या अंतिम सामन्यात 
 • अंतिम सामन्यातील दोन्ही मैदानी गोल बचावपटूंनी करण्याची ही पहिलीच वेळ
 • इंग्लंडने केवळ २२ टक्के शूटआऊट (९ पैकी २) जिंकल्या आहेत. युरोपात सर्वात कमी
 • इटली सलग ३४ सामन्यांत अपराजित. ब्राझील आणि स्पेनच्या सर्वाधिक ३५ अपराजित सामन्यांच्या विक्रमापासून एक सामना दूर
 • यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोचे. अखेरच्या चार संघांत नसतानाही ही कामगिरी केलेला रोनाल्डो पहिला खेळाडू 

अशी झाली लढत
तपशील         इटली      इंग्लंड

चेंडूवर वर्चस्व    ६१%      ३९%
पास अचूकता    ९१%      ७८%
यशस्वी पास      ७५८       ३४०
धाव (किमी)     १४४.६     १४३.३
गोलचे प्रयत्न        २०          ६
ऑन टार्गेट          ६           १
कॉर्नर्स               ३            ५
टॅकल्स              २५         १२
फाऊल्स            २१         १३
ताकीद               ५           १


​ ​

संबंधित बातम्या