ईपीएल : लिसेस्टर व मँचेस्टर सिटीने आपापले सामने जिंकत क्रमवारीत घेतली बढत  

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

लिसेस्टर व मँचेस्टर सिटीने आपापले सामने जिंकत इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत एक-एकने बढत घेतली आहे.   

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत न्यू कॅसल आणि लिसेस्टर सिटी यांच्यात झालेल्या सामन्यात लिसेस्टर सिटी संघाने विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासोबतच लिसेस्टर सिटी संघाने क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. तर टोटेनहॅमचा संघ चौथ्या नंबरवर घसरला आहे. काल झालेल्या सामन्यात  लिसेस्टर सिटीच्या संघाने न्यू कॅसलवर 2 - 1 ने विजय मिळवला आहे. याशिवाय दुसऱ्या एका सामन्यात मँचेस्टर सिटीच्या संघाने चेल्सी संघावर विजय मिळवलेला आहे. मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यात काल झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने 3 - 1 ने चेल्सीवर विजय मिळवला आहे.   

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

लिसेस्टर सिटी आणि न्यू कॅसल यांच्यात झालेल्या सामन्यात, दोन्ही संघांना खेळाच्या पहिल्या सत्रात एकही गोल नोंदवता आला नाही. तर लिसेस्टर सिटी संघाच्या जेम्स मॅडीसनने 55 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर लिसेस्टर सिटीच्याच युरी टिलेमन्सने 72 व्या मिनिटाला गोल करून संघाला बढत मिळवून दिली. तर न्यू कॅसलच्या अँडी कॅरोलने 82 व्या मिनिटाला संघाकडून एकमेव गोल केला. त्यामुळे या सामन्यात लिसेस्टर सिटीच्या संघाने सहजरित्या  न्यू कॅसलचा 2 - 1 असा पराभव करत, आपला स्पर्धेतील दहावा विजय मिळवला. 

मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यात झालेल्या सामन्यात, मँचेस्टर सिटीच्या ल्काई गुंडोनने 18 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलच्या चार मिनिटानंतरच फिल फोडेनने गोल करून मँचेस्टर सिटी संघाला बढत घेऊन दिली. तर 34 व्या मिनिटाला केव्हिन ब्रायनने गोल केल्याने सामन्याच्या पहिल्याच सत्रात मँचेस्टर सिटी संघाने 3 - 0 ने बढत मिळवली होती. त्यानंतर इंज्युरी टाइम मध्ये चेल्सी संघाच्या कॅलूमने 90+2 मिनिटाला एकमेव गोल केला. त्यामुळे मँचेस्टर सिटीने चेल्सी संघावर विजय मिळवत क्रमवारीत पहिल्या पाच मध्ये झेप घेतली.          

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत लिव्हरपूलचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. लिव्हरपूल संघाने 16 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत 33 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडच्या संघाने 16 सामन्यांपैकी 10 लढतीत विजय मिळवलेला आहे. व त्यांचे देखील 33 अंक आहेत. परंतु लिव्हरपूल संघापेक्षा मँचेस्टर युनायटेड संघाचे गोल कमी असल्याकारणामुळे मँचेस्टर युनायटेडचा संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर  आहे. आणि यानंतर आता लिसेस्टर सिटीचा संघ तिसऱ्या स्थानी पोहचला असून, लिसेस्टर सिटी संघाने 17 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने 32 गुण झाले आहेत. तर टोटेनहॅम व मँचेस्टर सिटी या दोघांचेही समान 29 अंक आहेत. मात्र गोलच्या बाबतीत टोटेनहॅमचा संघ पुढे असल्यामुळे टोटेनहॅम चौथ्या आणि मँचेस्टर सिटी पाचव्या स्थानावर पोहचला आहे.                 


​ ​

संबंधित बातम्या