मेस्सीचा बार्सिलोना निरोप  कायद्याच्या कचाट्यात? 

संजय घारपुरे
Thursday, 27 August 2020

मेस्सी बार्सिलोनाच्या व्यवस्थापनावर नाराज होता. त्याने क्‍लबचा निरोप घेण्याचे ठरवल्याने शेकडो चाहत्यांनी क्‍लबच्या मुख्यालयासमोर अध्यक्ष जोसेप मारिया बार्तोमेऊ यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्याच वेळी मेस्सीच्या खरेदीसाठी युरोपातील आघाडीच्या क्‍लबमध्ये स्पर्धा सुरु झाली.

बार्सिलोना: लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्‍लब सोडण्याचा निर्णय अधिकृतपणे कळवला आहे; मात्र आता त्याच्या पत्रामुळे यात कायदेशीर प्रश्न येण्याची शक्‍यता आहे. बार्सिलोना मेस्सीला नव्याने करारबद्ध करणाऱ्या क्‍लबकडून 70 कोटी युरो शुल्क मागण्याची शक्‍यता आहे. मेस्सीने काही वर्षांपूर्वी नव्याने करार करताना बार्सिलोनास काहीही रक्कम न देता मुक्त होण्याची अट घातली होती. आत्ताही त्याच्या वकिलांनी क्‍लबला पाठवलेल्या पत्रात दोघांनी परस्परांच्या सहमतीने करार रद्द करावा, असे म्हंटले आहे. बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील संबंध या वर्षात खूपच बिघडले. त्यातच बार्सिलोनास चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिचविरुद्ध 2-8 पराभव पत्करावा लागल्याने मेस्सीने निरोप घेण्याचे ठरवले. 

केंद्र सरकार घेणार चीनच्या सहभागाची स्पर्धा

मेस्सी बार्सिलोनाच्या व्यवस्थापनावर नाराज होता. त्याने क्‍लबचा निरोप घेण्याचे ठरवल्याने शेकडो चाहत्यांनी क्‍लबच्या मुख्यालयासमोर अध्यक्ष जोसेप मारिया बार्तोमेऊ यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्याच वेळी मेस्सीच्या खरेदीसाठी युरोपातील आघाडीच्या क्‍लबमध्ये स्पर्धा सुरु झाली. मॅंचेस्टर सिटी, पीएसजी आणि इंटर मिलान त्यात आघाडीवर आहेत. सिटीने मेस्सीला सध्याचे आठवड्याचे दहा लाख युरो मानधन वाढवून देण्याची तयारीही दाखवल्याचे समजते. अर्थात मेस्सी आणि बार्सिलोनातील कायदेशीर लढाई किती होणार की समेटाने प्रश्न सुटणार हे महत्त्वाचे आहे. बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करारानुसार स्टार खेळाडूने 10 जूनपूर्वी आपला निर्णय कळवणे बंधनकारक आहे. हे केल्यासच त्याला काहीही रक्कम न देता मुक्त होता येईल, असे करारातील कलम सांगते; मात्र यंदा मोसमच लांबला आहे. त्यामुळे याचा फायदा मेस्सीला होऊ शकेल, असे मार्का या स्पेनमधील वर्तमानपत्राने म्हंटले आहे. 

अँडरसनच्या धमाकेदार कामगिरीनंतर युवराजने दिलं बुमराहला टार्गेट

प्रसंगी शुल्क भरण्याची तयारी 
मेस्सी कोणत्याही परिस्थितीत बार्सिलोनाबरोबर राहण्यास तयार नाही. काही वर्षांपूर्वी त्याने हा विचार केला होता, त्या वेळी त्याला संघनिवडीत जास्त अधिकार हवे होते. आता फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक ट्रान्स्फर शुल्क देण्याची त्याची तयारी आहे. त्यामुळे प्रसंगी त्याच्या मानधनावरही याचा परिणाम होऊ शकेल. मेस्सीने काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक कोएमन यांना क्‍लब सोडण्याचा विचार करीत आहोत, हे सांगितले होते. त्याबाबत कोएमन तसेच आपण मौन बाळगूनही बातमी लीक कशी झाली. यामुळेही मेस्सी संतप्त झाला आहे. 

मेस्सी आणि बार्सिलोना 
- अर्जेंटिनातील नेवेल ओल्ड बॉईज संघातून 13 वर्षांचा असताना बार्सिलोनाकडे (2000) 
- बार्सिलोनाकडून खेळताना 731 लढतीत 634 गोल 
- बार्सिलोनाच्या एकंदर 34 प्रमुख विजेतेपदात मोलाचा वाटा 
- दहा वेळा ला लिगा विजेते, तर चार वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली 
- ला लिगामध्ये सर्वाधिक 444 गोलचा विक्रम 
- बॅलॉन डी ओर तसेच सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्याचा पराक्रम प्रत्येकी सहा वेळा 
- 2012 मध्ये 79 गोल करण्याचा पराक्रम 
- सलग दहा मोसमात किमान चाळीस गोल करणारा एकमेव खेळाडू 
- चॅम्पियन्स लीगमध्ये एकाच क्‍लबकडून खेळताना सर्वाधिक 115 गोल करण्याचा पराक्रम


​ ​

संबंधित बातम्या