लिओेनेल मेस्सीने नाकारली हॅट्रिकची संधी

पीटीआय
Saturday, 24 April 2021

लिओेनेल मेस्सीच्या चमकदार खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये  गेताफेचा ५-२ असा पराभव केला.

क्रिकेट बार्सिलोना - लिओेनेल मेस्सीच्या चमकदार खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये  गेताफेचा ५-२ असा पराभव केला. दोन गोल केलेल्या मेस्सीने भरपाई वेळेतील पेनल्टी किक घेण्यास नकार देत सहकाऱ्यांच्या गोलला महत्त्व दिले.

बार्सिलोना या विजयाने विजेतेपदाच्या शर्यतीत कायम राहिले आहेत; पण मेस्सीने अँतॉईन ग्रिएजमन याला दिलेली गोल करण्याची संधी जास्त चर्चेत आहे. मेस्सी जगात सर्वोत्तम आहे. तो गोलची कोणतीही संधी सोडत नाही; पण त्याच वेळी त्याच्यासाठी संघ जास्त मोलाचा असतो, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक रोनाल्ड कोएमन यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात कोपा डेल रे स्पर्धा जिंकलेले बार्सिलोना आणि आघाडीवरील अॅटलेटिको माद्रिद यांच्यात पाच गुणांचा फरक आहे; पण बार्सिलोना एक लढत कमी खेळले आहेत. अॅटलेटिकोने हुएस्काला २-० असे हरवत सलग दुसरा विजय मिळवला. ही कामगिरी त्यांनी जानेवारीनंतर प्रथमच साधली. त्यापूर्वी त्यांनी १३ पैकी केवळ चारच लढती जिंकल्या होत्या.

ला लिगा लढतीत सुपर लीगचे पडसाद उमटले. अॅटलेटिकोने या लीगमधून माघार घेतली असली, तरी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद अजूनही या लीगमध्ये आहेत. गेताफेने सुपर लीगला विरोध करणारे टी-शर्ट परिधान केले होते; पण त्याच वेळी कोपा डेल रे स्पर्धा जिंकल्याबद्दल बार्सिलोना संघास सन्मानही दिला. मेस्सीचे या मोसमात ३३ गोल झाले आहेत. त्याने स्पॅनिश लीगमध्ये २५ गोल केले आहेत. त्यापेक्षा एक गोल कमी गेताफे संघाने केला आहे. ते सध्या ला लिगामधील स्थान राखण्यासाठी झगडत आहेत. 

बार्सिलोना, रेयाल माद्रिद सुपर लीगबाबत ठाम
सुपर लीगमधून अनेक संघ बाहेर पडले असले, तरी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या लीगच्या संयोजनासाठी अजून प्रयत्नशील आहेत. सुपर लीगची संकल्पना मांडलेल्या क्लबबाबत युरोपिय महासंघ निर्णय घेणार आहे. सुपर लीगसाठी एकत्र आलेल्या बारापैकी नऊ संघांनी माघार घेतली. रेयाल, बार्सिलोना युव्हेंटिस अद्याप कायम असले, तरी युव्हेंटिसने लीग सुरू होणार नाही, हे स्वीकारले आहे. सुपर लीगपासून दूर जाणे ही ऐतिहासिक चूक ठरेल, असे बार्सिलोनाने सांगितले आहे.


​ ​

संबंधित बातम्या