अर्जेंटिनाच्या विजयात मेस्सी प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 June 2021

अर्जेंटिनाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील पॅराग्वेविरुद्धच्या लढतीच्या वेळी मार्गदर्शक लिओनेल स्कालोनी यांनी लिओनेल मेस्सीला ब्रेक देण्याचे ठरवले होते. पण त्यांनी ऐनवेळी मेस्सीला विक्रमी १४७ व्या सामन्यात खेळण्याचे ठरवले.

साओ पावलो - अर्जेंटिनाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील पॅराग्वेविरुद्धच्या लढतीच्या वेळी मार्गदर्शक लिओनेल स्कालोनी यांनी लिओनेल मेस्सीला ब्रेक देण्याचे ठरवले होते. पण त्यांनी ऐनवेळी मेस्सीला विक्रमी १४७ व्या सामन्यात खेळण्याचे ठरवले. मेस्सीच्याच प्रभावी कामगिरीमुळे अर्जेंटिनाला निर्णायक गोल करता आला आहे, तसेच बाद फेरीही निश्चित झाली.

मेस्सीविना संघ ही कल्पनाच रुचत नाही. सध्याचे वातावरण खेळाडूंच्या क्षमतेचा पूर्ण कस पाहत आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती आवश्यकच आहे, पण मेस्सीबाबत हे करणे अवघड होते, असे स्कालोनी यांनी सांगितले. मेस्सी संघाच्या स्पर्धेतील तीनही लढतीत पूर्णवेळ खेळला आहे. तीन सामन्यांत मिळून त्याचा चेंडूला दोनशेवेळा स्पर्श झाला आहे. आता त्याला बाद फेरीपूर्वी एकदा तरी ब्रेक द्यावाच लागेल, असे स्कालोनी म्हणाले.

मेस्सी ब्रेकसाठी किती तयार असेल हा प्रश्नच आहे. आपण व्यावसायिक स्पर्धांत अनेकवेळा यश मिळवले, पण एकही आंतरराष्ट्रीय जेतेपद नाही हे त्याला सलत आहे. 

अर्जेटिनाने १९९३ च्या कोपा अमेरिका विजेतेपदापासून एकही स्पर्धा जिंकलेली नाही. पॅराग्वेविरुद्धचा विजयाचा दुष्काळ संपवण्यात मेस्सीचा मोलाचा वाटा होता. मेस्सीने सुरेख चाल रचत अँगेल डे मारियाकडे चेंडू छान सोपवला. मारियाने त्याच्या भोवती झालेला गराडा पाहून गोमेझकडे चेंडू पास केला आणि अर्जेंटिनाने एकमेव गोल केला.

सुआरेझमुळे बरोबरी
लुईस सुआरेझच्या गोलमुळे उरुग्वेने चिलीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. चिलीचा गोल त्यांचा प्रमुख आक्रमक व्हॅरगास याने केला. अर्जेंटिनाविरुद्ध गोल करू न शकलेल्या उरुग्वेची सुरुवात चांगली होती, पण आघाडी चिलीने घेतली, पण सुआरेझने उरुग्वेला स्पर्धेतील पहिला गुण मिळवून दिला.

स्पर्धेत १४० कोरोनाबाधित
कोपा अमेरिका फुटबॉलशी संबंधित कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या स्पर्धेशी संबंधित १४० जणांना बाधा झाली आहे; मात्र १५ हजार २३५ चाचण्यांनंतरही ही संख्या आहे, याकडे संयोजक लक्ष वेधत आहेत. बाधितात प्रामुख्याने कामगार, स्पर्धेसाठी करारबद्ध केलेले कर्मचारी आहेत असे सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या