मेस्सी-बार्सिलोना फेरकरारात आर्थिक नियंत्रणाचा ‘फाऊल’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

फुटबॉल जगतातील सर्वात महागड्या खेळाडूत गणना होत असलेला लिओनेल मेस्सी सध्या कोणत्याच क्लबसह करारबद्ध नाही. त्याचा बार्सिलोनाबरोबरील करार ३० जूनला संपला आहे. तो बार्सिलोनासह राहण्यास उत्सुक आहे, पण ला लिगा अर्थात स्पॅनिश लीगने अमलात आणलेल्या आर्थिक नियंत्रणाचा त्यात अडथळा येत आहे.

बार्सिलोना - फुटबॉल जगतातील सर्वात महागड्या खेळाडूत गणना होत असलेला लिओनेल मेस्सी सध्या कोणत्याच क्लबसह करारबद्ध नाही. त्याचा बार्सिलोनाबरोबरील करार ३० जूनला संपला आहे. तो बार्सिलोनासह राहण्यास उत्सुक आहे, पण ला लिगा अर्थात स्पॅनिश लीगने अमलात आणलेल्या आर्थिक नियंत्रणाचा त्यात अडथळा येत आहे. 

मेस्सीला तेराव्या वर्षी बार्सिलोनाने करारबद्ध केले. २००० च्या सप्टेंबरपासून बार्सिलोनाकडे असलेला मेस्सी सध्या कोणत्याही क्लबसह करारबद्ध नाही. गतवर्षी मेस्सी क्लबचा निरोप घेण्यास उत्सुक होता. मात्र आता तो बार्सिलोनाकडे राहण्यास उत्सुक आहे. क्लबचीही त्याच्यासह फेरकरार करण्याची तयारी आहे, पण दोघांतील नवा करार स्पॅनीश लीगने आर्थिक नियंत्रणासाठी केलेल्या चौकटीत कसा बसवणार, हा प्रश्न आहे. 

मेस्सी आणि क्लबमधील बोलणी चांगल्या प्रकारे होत आहे. तो राहण्यास उत्सुक आहे. त्याने कायम रहावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत, मात्र हे आम्हाला नियमाच्या चौकटीत बसवावे लागणार आहे, असे बार्सिलोना क्लबचे प्रमुख जोआन लापोर्ता यांनी सांगितले. आम्ही विविध पर्याय तपासून बघत आहोत. त्याला सर्वोत्तम करार देण्याचाच आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

ला लिगाने २०१३ मध्ये प्रत्येक क्लबने खेळाडू, तसेच सपोर्ट स्टाफच्या मानधनावर किती खर्च करावा याची मर्यादा निश्चित केली. व्यावसायिक फुटबॉलमध्ये बार्सिलोनाचे उत्पन्न सर्वाधिक असल्याचे देलॉती मनी लीगने म्हटले आहे. अर्थात कोरोनामुळे त्यांचे उत्पन्न १२ कोटी ५० लाख युरोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

ला लिगाने २०१९-२० च्या मोसमात बार्सिलोनास खेळाडूंच्या मानधनासाठी १ अब्ज ४७ कोटी युरो खर्च करण्याची परवानगी दिली. गेल्या मोसमात ते ७३ कोटी ३० लाख युरोवर आणण्यात आले. आता तिकीट विक्रीचे उत्पन्न नसल्याने त्यात घट अपेक्षित आहे. काही अभ्यासकांच्या मते बार्सिलोनास यंदा मानधनात पुन्हा कपात करावी लागेल, यास्थितीत मेस्सीला लौकिकास साजेशी रक्कम देणे अवघडच होईल.


​ ​

संबंधित बातम्या