इंग्लंड पराभवानंतर वर्णद्वेष शिगेला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 July 2021

युरो फुटबॉल स्पर्धेत इंग्लंड पराजित झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली आहे. शूटआऊटवर पेनल्टी हुकलेले तीनही खेळाडू कृष्णवर्णीय असल्यामुळे ही मोहीम समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.

लंडन - युरो फुटबॉल स्पर्धेत इंग्लंड पराजित झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली आहे. शूटआऊटवर पेनल्टी हुकलेले तीनही खेळाडू कृष्णवर्णीय असल्यामुळे ही मोहीम समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. 

पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे, पण यास राजकीय रंगही दिला जात आहे. या स्पर्धेत इंग्लंड खेळाडूंनी वर्णद्वेषास आपला विरोध असल्याचे दाखवले. त्यास ब्रिटनमधील अनेक मंत्र्यांनी पाठिंबा दिला नव्हता याकडे आता लक्ष वेधले जात आहे. खेळाडूंच्या वर्णावरून होणारी टिप्पणी परदेशातून होत आहे तसेच ब्रिटनमधूनही, असे इंग्लंडचे मार्गदर्शक साऊथगेट यांनी सुनावले. 

इंग्लंड खेळाडूंनी वर्णद्वेशास आपला विरोध दाखवला, त्यावेळी काही चाहत्यांनी हुर्यो उडवली होती. त्यांना लक्ष्य करणाऱ्यांचे प्रमाण इंग्लंडमध्ये खूपच कमी होते. चांगली कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाचे कौतुक व्हायला हवे. वर्णद्वेषावरून त्यांना लक्ष्य करणे गैर आहे, असे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितले. जॉन्सन यांच्या प्रवक्त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीस वर्णद्वेषाचा निषेध करणाऱ्या खेळाडूंची हुर्यो उडवणाऱ्यांचा निषेध करण्यास नकार दिला होता. अंतर्गत सुरक्षा मंत्री प्रीती पटेल यांनी मैदानात राजकारण नको, असे सांगितले होते. 

पटेल आणि जॉन्सन यांच्या टिप्पणीचे हे परिणाम आहेत, अशी टीका आता विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष असलेल्या प्रिन्स विल्यम्स यांनी वर्णद्वेषी टिप्पणी तातडीने थांबणे आवश्यक असल्याचे सांगितले. दरम्यान, ट्विटरने आपण  एक हजार वर्णद्वेषी ट्विट काढून टाकल्या आहेत, तसेच काही अकाऊंट बंद केले आहेत, असे सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या