युरोपियन फुटबॉल सुपर लीगला किकऑफपूर्वीच रेड कार्ड

पीटीआय
Thursday, 22 April 2021

प्रस्तावित युरोपियन फुटबॉल सुपर लीगला किकऑफपूर्वीच रेड कार्ड लाभले आहे. चाहत्यांच्या कडव्या विरोधानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हस्तक्षेप केला आणि प्रीमियर लीगमधील सहा संघांनी या सुपर लीगमधून बाहेर पडण्याचे ठरवले.

लंडन - प्रस्तावित युरोपियन फुटबॉल सुपर लीगला किकऑफपूर्वीच रेड कार्ड लाभले आहे. चाहत्यांच्या कडव्या विरोधानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हस्तक्षेप केला आणि प्रीमियर लीगमधील सहा संघांनी या सुपर लीगमधून बाहेर पडण्याचे ठरवले. जर्मनीतील संघांनी यापूर्वीच माघार घेतल्याने आता केवळ स्पेन आणि इटलीतीलच संघ यात राहिले आहेत.

मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सी, टॉटनहॅम आणि आर्सेनल या सहा संघांनी या सुपर लीगमध्ये न खेळण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे लीगच्या स्थापनेत असलेल्या १२ संघांना या स्पर्धेतील सहभाग तसेच अब्जावधी डॉलर निश्चित होते; मात्र प्रीमियर लीगमधील संघाच्या चाहत्यांनी क्लबच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे प्रीमियर लीगमधील संघ बाहेर पडले. बायर्न म्युनिचने यापूर्वीच या लीगमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले होते.

सुपर लीगला असलेला चाहत्यांचा विरोध पाहून ब्रिटनमधील अनेक राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतली. एवढेच नव्हे, तर या डर्टी डझनविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रीमियर लीगमधील आघाडीच्या क्लबसह चर्चा केली होती. प्रथम सिटीने माघारीचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ प्रीमियर लीगमधील अन्य संघांनी ४८ तासांत माघारीची घोषणा केली. यामुळे या लीगमध्ये आता रेयाल माद्रिद, बार्सिलोना, अॅटलेटिको माद्रिद, एसी मिलान, युव्हेंटिस, इंटर मिलान हेच संघ राहिले आहेत. सुपर लीगची स्थापना करणाऱ्या १२ संघांत ४.२ अब्ज डॉलर प्रतिवर्षी वाटून घेतले जाणार होते. त्याशिवाय १५ संस्थापक क्लबचा सहभाग निश्चित होता. २० क्लबमध्ये स्पर्धा असल्याने पाचच संघांच्या स्थानासाठी स्पर्धा होती. 

अॅटलेटिको, इंटरचीही माघार
अॅटलेटिको माद्रिद तसेच इंटर मिलाननेही सुपर लीगपासून दूर राहण्याचे ठरवल्यामुळे सुपर लीगची योजना कधी अधिकृतपणे रद्द होणार, एवढेच औत्सुक्य राहिले आहे. सुपर लीग खेळण्यास मंजुरी देताना असलेली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूपच फरक आहे, त्यामुळे अॅटलेटिको सुपर लीगमध्ये खेळणार नाही, असे सांगण्यात आले. सहा संघ बाहेर पडल्यानंतर इंटर मिलाननेही माघार घेतली.


​ ​

संबंधित बातम्या