५० मीटरवरून किक, चेंडू थेट गोलजाळ्यात; पॅट्रिक शिकची कमाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 June 2021

गोलक्षेत्राच्या आसपास चेंडू असताना तो गोलजाळ्यात धाडणे अनेक खेळाडूंना प्रसंगी अशक्य होते; पण चेक प्रजासत्ताकच्या पॅट्रिक शिक याने थेट मध्यरेषेच्या जवळून किक मारली आणि चेंडू थेट गोलजाळ्यात गेला.

ग्लास्गो - गोलक्षेत्राच्या आसपास चेंडू असताना तो गोलजाळ्यात धाडणे अनेक खेळाडूंना प्रसंगी अशक्य होते; पण चेक प्रजासत्ताकच्या पॅट्रिक शिक याने थेट मध्यरेषेच्या जवळून किक मारली आणि चेंडू थेट गोलजाळ्यात गेला. स्कॉटलंडचे प्रमुख आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील पुनरागमन चेक प्रजासत्ताकच्या शिकच्या विक्रमी गोलने संस्मरणीय झाले. 

पूर्वार्धात हेडरवर त्याने केलेल्या गोलची उत्तरार्धाच्या सुरुवातीस चर्चा होत असताना पॅट्रिकने ५२ व्या मिनिटास हा अविश्वसनीय गोल केला. खरे तर त्या वेळी गोल होईल, याची कोणालाही कल्पनाही नव्हती. एका गोलने मागे पडलेले स्कॉटलंड बरोबरीच्या गोलसाठी चांगलेच आतूर झाले होते. स्कॉटलंडचा बचावपटू जॅक हेंड्रीचा शॉट चेक खेळाडूने रोखला. चेंडू त्याच्या पायाला लागून पॅट्रिकच्या दिशेने आला. मध्यरेषेजवळ असलेल्या पॅट्रिकने गोलपोलस्टच्या दिशेने बघितले. तो आणि गोलरक्षक यांच्यात एकच बचावपटू होता. तसेच गोलरक्षक योग्य जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चेंडूला जोरदार किक दिल्याचे पाहिल्यावर गोलरक्षक धावला; पण चेंडू त्याच्या डोक्यावरून गोलजाळ्यात गेला. पॅट्रिकची किक पाहून सगळेच अचंबित झाले होते. त्यामुळे मैदानात कमालीची शांतता होती. त्यामुळे चेंडू गोलपोस्टवर लागल्याचा आवाजही सर्वांनी ऐकला.


​ ​

संबंधित बातम्या