सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत छेत्री मेस्सीपेक्षा सरस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या स्पर्धेत फुटबॉलचा स्टार लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूतील गोलच्या क्रमवारीत छेत्री आता ख्रिस्तियानो रोनाल्डोपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दोहा - सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या स्पर्धेत फुटबॉलचा स्टार लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूतील गोलच्या क्रमवारीत छेत्री आता ख्रिस्तियानो रोनाल्डोपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. छेत्रीला सार्वकालिक सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल केलेल्या खेळाडूंच्या टॉप टेन क्रमवारीत स्थान मिळण्यासाठी एक गोल हवा आहे.

विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत छेत्रीच्या दोन गोलमुळे भारताने २-० बाजी मारली. छेत्रीचे आता एकंदर ७४ गोल झाले आहेत; तर मेस्सीचे आंतरराष्ट्रीय गोल ७२ आहेत. रोनाल्डोचे १०३ गोलसह अव्वल आहे. छेत्रीने या क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवताना मेस्सीला दोन गोलनी; तर अमिरातीच्या अली माबखौत याला एका गोलने मागे टाकले आहे. मेस्सीने त्याचा ७२ वा आंतरराष्ट्रीय गोल चिलीविरुद्धच्या विश्वकरंडक पात्रता लढतीत केला होता; तर माबखौतने त्याचा अखेरचा गोल मलेशियाविरुद्ध केला होता.

कतारविरुद्ध चमकदार कामगिरी केलेला गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू आपल्या कर्णधाराचे कौतुक करण्यासाठी कमालीचा उत्सुक होता. रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या स्पर्धेत असलेला एक खेळाडू आमच्याकडे आहे आणि मी त्याचा संघसहकारी आहे याचा मला अभिमान आहे. तो आहे कर्णधार सुनील छेत्री, असे सांगून गुरप्रीत म्हणाला, त्याचे गोल पाहिले की तो संघासाठी किती झोकून देतो, त्याच्या खेळात किती सातत्य आहे हे लक्षात येते. काय जबरदस्त आहे तो, सतत गोल करीत असतो.

गुरप्रीतचे शांतपणे ऐकताना छेत्रीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. त्याला आपल्या गोलपेक्षा सामन्यातील संघाची कामगिरी जास्त सतावत होती. आपले डोके हलवून काहीसे हसत तो म्हणाला

सर्वाधिक गोल क्रमवारी
(सध्या खेळत असलेल्या खेळाडूंची)
नाव                                   देश         गोल

रोनाल्डो                          पोर्तुगाल      १०३
सुनील छेत्री                      भारत          ७४
अली माबखौत                अमिराती       ७३
लिओनेल मेस्सी               अर्जेंटिना       ७२
रॉबर्ट लेवांडोवस्की            पोलंड         ६६

मी किती गोल केले हे कधीच मोजत नाही. १० वर्षांनी आपण यासंदर्भात नक्कीच चर्चा करू. त्या वेळी नक्की गोल किती केले हे मोजण्यास मी तयार असेन. आतापर्यंतचे गोल इतिहास आहे
- सुनील छेत्री


​ ​

संबंधित बातम्या