चर्चा रोनाल्डोला उशिरा खेळविण्याची

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

ख्रिस्तियानो रोनाल्डो युव्हेंटस संघाला गुडबाय करण्याच्या चर्चा रंगत असताना त्याला उदिनेसी संघाविरुद्ध सुरवातीपासून खेळवण्यात आले नाही त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. प्रत्यक्ष सामन्यात मात्र युव्हेंटसने दोन गोलांची आघाडी गमावली आणि त्यांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मिलान - ख्रिस्तियानो रोनाल्डो युव्हेंटस संघाला गुडबाय करण्याच्या चर्चा रंगत असताना त्याला उदिनेसी संघाविरुद्ध सुरवातीपासून खेळवण्यात आले नाही त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. प्रत्यक्ष सामन्यात मात्र युव्हेंटसने दोन गोलांची आघाडी गमावली आणि त्यांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

एकीकडे लिओनेस मेस्सीने बार्सिलोना सोडून पीएसजीत प्रवेश केल्यामुळे मेस्सीवर प्रकाशझोत आलेला आहे त्याचवेळी रोनाल्डो आता युव्हेंटसमधून बाहेर जाणार अशा चर्चा रंगत आहेत. या सामन्यात रोनाल्डोला सुरवातीपासून खेळवण्यात आले नाही, काही वेळानंतर तो मैदानात आला, पण संघाला  विजय मिळवून देऊ शकला नाही.

या सामन्यात सर्वांचे लक्ष रोनाल्डोवर होते. युव्हेंटसच्या २-० अशा आघाडीनंतर सामना २-२ अशा स्थितीत होता. भरपाई वेळेत रोनाल्डोने अखेरचा प्रयत्न केला. चेंडू गोलजाळ्यातही मारला, परंतु ऑफसाईडमुळे गोल वैध ठरला नाही.

सामन्यानंतर बोलताना युव्हेंटसचे मार्गदर्शक मासिमिलीनाओ अलेगिरी यांनी रोनाल्डोबाबतच्या चर्चांना महत्त्व दिले नाही, रोनाल्डोला लवकरात लवकर मैदानात आणण्याचे मी ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. तो व्यवस्थित आहे. ही तर मोसमाची सुरवात आहे. परिस्थितीनुसार आम्ही सामन्याची आखणी करत आहोत. अंतिम क्षणी रोनाल्डोच्या चपळतेची जास्त गरज असेल हा विचार करून मी त्याला सुरवातीला खेळवले नव्हते, असेही समर्थन अलेगिरी यांनी केले. 

सामन्याला आपल्या कधी खेळायला मिळाले याला रोनाल्डोने महत्त्व दिले नाही. त्याने झुंजार खेळ केला. गोलही केला होता, परंतु दुर्दैवाने तो वैध ठरला नाही, असे अलेगिरी म्हणाले. सुरवातीला रोनाल्डोच्या अनुपस्थितीत पौलो दिबाला युव्हेंटसचे नेतृत्व करत होता. त्याच्यासह जुआन कॉर्दादो यांनी मध्यंतरापूर्वीच दोन गोल करून युव्हेंटला आघाडीवर नेले होते. पण दुसऱ्या अर्धात उदिनेसी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला.


​ ​

संबंधित बातम्या