माजी ऑलिंपिक बॅडमिंटन विजेती ली झुएरुईचा निवृत्तीचा निर्णय

वृत्तसंस्था
Friday, 18 October 2019

- चीनची आघाडीची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि माजी ऑलिंपिक विजेती ली झुएरुई हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

-  तिने 2012 मध्ये वॅंग यिहान हिचा तीन गेममध्ये पराभव करून ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविले होते.

-यावर्षी सप्टेंबर महिन्यात ती कोरिया ओपन स्पर्धेत खेळली. ही तिची अखेरची स्पर्धा ठरली.

नवी दिल्ली ः चीनची आघाडीची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि माजी ऑलिंपिक विजेती ली झुएरुई हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. ली हिने वयाच्या 28 व्या वर्षी हा निर्णय घेतला असून, कारकिर्दीत तिने सुपर सिरीजमधील 14 विजेतिपदे मिळविली आहेत. 
कधीही हार न मानणारी आक्रमक खेळाडू म्हणून तिची ओळख होती. तिने 2012 मध्ये वॅंग यिहान हिचा तीन गेममध्ये पराभव करून ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर 2013 मध्ये तिचा जागतिक महासंघाच्या वतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला होता. रियो ऑलिंपिकमध्ये झालेल्या दुखापतीनंतर मात्र तिच्या यशाचा आलेख खालावला होता. वयाच्या 19व्या वर्षी तिने आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तिचे हे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद होते. ऑल इंग्लंड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचेही तिने 2012 मध्ये विजेतेपद मिळविले होते. 
सुपर सिरीजमधील हे तिचे पहिले विजेतेपद ठरले. त्याचवर्षी चीनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत तिला संभाव्य विजेती म्हणून बघितले जात होते. मात्र, युवा रॅटचॅनॉक इन्टॅनॉन हिने तिला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. रियो ऑलिंपिकमध्ये ती उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनविरुद्ध हरली. अर्थात, त्या वेळी ती कोर्टवर कोसळली होती. तिच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर एक वर्ष ती कोर्टपासून दूर होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ती कोरिया ओपन स्पर्धेत खेळली. ही तिची अखेरची स्पर्धा ठरली. या स्पर्धेत पहिल्याच फेरीत तिला दुखापतीमुळे जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध माघार घ्यावी लागली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या