बायर्न म्युनिचची जर्मन लीगमधील सर्वांत मोठी हार

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

- बायर्न म्युनिचला बंडेस्लिगा अर्थात जर्मनी फुटबॉल लीगमध्ये एइनत्राश्‍त फ्रॅंकफर्टविरुद्ध 1-5 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली.

- स्पर्धा इतिहासातील बायर्नचा हा सर्वांत मोठा पराभव आहे. 

बर्लिन - बायर्न म्युनिचला बंडेस्लिगा अर्थात जर्मनी फुटबॉल लीगमध्ये एइनत्राश्‍त फ्रॅंकफर्टविरुद्ध 1-5 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. स्पर्धा इतिहासातील बायर्नचा हा सर्वांत मोठा पराभव आहे. 
बायर्नच्या जेरोमे बोएटेंग याला नवव्या मिनिटास धसमुसळ्या खेळाबद्दल बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर बायर्नचा खेळ खालावतच गेला. या पराभवामुळे गतविजेते बायर्न चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. ते आणि आघाडीवरील बायर्न मोएशेनग्लॅडबॅश यांच्यात चार गुणांचा फरक आहे. बायर्नला 2008-9 मध्ये वोल्वस्‌बर्गविरुद्ध 1-5 हार पत्करावी लागली होती. त्यानंतरही ते विजेते झाले होते. 

11 वर्षांपूर्वीच्या पराभवाची आठवण करून दिल्यावर बायर्नचे मार्गदर्शक कोवाक यांनी मी कधीही हार पत्करत नाही, असे सुनावले. सुरवातीच्या रेड कार्डने गणित बिघडल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, विश्रांतीच्या बरोबरीनंतर उत्तरार्धात स्वीकारावे लागलेले चार गोल त्यांना सलत होते. आता या परिस्थितीत चॅम्पियन्स लीगमधील यशोमालिका बायर्न कशी राखणार, हा प्रश्‍न आहे. 

पीएजीची सनसनाटी हार 
पॅरिस ः पीएसजीला लीग वनमध्ये अव्वल साखळीत स्थान राखण्यासाठी झगडत असलेल्या दिजॉनविरुद्ध 1-2 अशी हार पत्करावी लागली. पीएसजीचा मोसमातील हा तिसरा पराभव. आता त्यांची आघाडी पाच गुणांचीच झाली आहे. दिजॉनने तीन मिनिटांत दोन गोल करीत पीएसजीला हादरवले. दरम्यान, लीलीच्या सदोष बचावात्मक खेळाचा फायदा घेत मार्सेलीने 2-1 बाजी मारली. 

पिछाडीनंतर लिव्हरपूलची सरशी 
लंडन ः लिव्हरपूलने पिछाडीनंतर ऍस्टॉन व्हिलाचा 2-1 असा पाडाव केला, तर मॅंचेस्टर सिटीने साऊदम्प्टनचे कडवे आव्हान 2-1 असे परतवले. लिव्हरपूलने आघाडी राखताना पूर्वार्धातील पिछाडीनंतर बाजी मारली. भरपाई वेळेत सादिओ मेन याने गोल करीत लिव्हरपूलचा अकराव्या सामन्यातील दहावा विजय साकारला. त्यांनी आता सिटीला सहा गुणांनी मागे टाकले आहे. सिटीने निर्णायक गोल 86व्या मिनिटास केला. चेल्सीने वॅटफोर्डला 2-1 असे हरवत तिसरा क्रमांक राखला. मॅंचेस्टर युनायटेडला बौर्नमाऊथविरुद्ध 0-1 हार पत्करावी लागली, तर आर्सेनलला वोल्वज्‌विरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. 

युव्हेंटिसची आघाडी कायम 
रोम ः युव्हेंटिसने सिरी ए अर्थात इटालियन लीगमधील आघाडी कायम राखताना तॉरीनोचा 1-0 असा पाडाव केला. इंटर मिलान बोलोग्नोला 2-1 हरवत युव्हेंटिसला मागे टाकण्याची चिन्हे होती. पण, मथायस डे लिग्त याने 20 मिनिटे असताना गोल करीत युव्हेंटिसला विजयी करीत अग्रस्थान राखले. युव्हेंटिस या मोसमात अद्याप लीगमध्ये अपराजित आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या