Ranji Trophy 2019 : विदर्भाच्या गणेश सतीशने मोडला 28 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

नरेंद्र चोरे
Thursday, 12 December 2019

गणेशने विदर्भाकडून प्रथमच द्विशतकी खेळी करताना आपल्या नावावर विक्रमांचीही नोंद केली. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी तर ठरलीच, शिवाय 28 वर्षांपूर्वीचा विदर्भाकडून रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याचा माजी कर्णधार समीर गुजरचा विक्रमही मोडीत काढला.

नागपूर : विदर्भ रणजी संघात सर्वात कमी बोलणारा खेळाडू, अशी ख्याती असलेल्या गणेश सतीशने आंध्र प्रदेशविरुद्‌ध मुलापाडू येथे कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट विक्रमी खेळी करून केवळ आपल्या संघाला तीन गुणच मिळवून दिले नाही तर, आपल्या टीकाकारांनाही सडेतोड उत्तर दिले. या खेळीमुळे गणेशचा आत्मविश्‍वास वाढणार असून, त्याचा उर्वरित सामन्यांमध्ये विदर्भाला निश्‍चितच फायदा होणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी व्यावसायिक खेळाडू म्हणून करारबद्‌ध झाल्यानंतर गणेशकडून विदर्भ क्रिकेट संघटनेला खूप अपेक्षा होत्या. परंतु, एखाद दुसरा अपवाद वगळता तो अपेक्षेवर खरा उतरला नाही. त्यामुळे टीकेचे लक्ष्य बनला होता. अलीकडे झालेल्या विजय हजारे एकदिवसीय करंडक व त्यानंतर मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेतही त्याची बॅट शांतच होती. त्यामुळे धावा काढण्याचे प्रचंड दडपण सतीशवर जाणवत होते. या अग्निपरीक्षेच्या प्रसंगी त्याने आंध्रविरुद्‌ध 237 धावांची जिगरबाज खेळी करून टीकाकारांना चूप बसविले. आंध्रला 211 धावांचा पाठलाग करताना विदर्भाची एकवेळ 3 बाद 61 अशी नाजूक अवस्था झाली होती. अशावेळी कुणाला तरी संघाची जबाबदारी खांद्‌यावर घेणे अपेक्षित होते. सुर्दैवाने या आणीबाणीच्या प्रसंगी गणेश एखाद्‌या देवदुताप्रमाणे संघाच्या मदतीला धावून आला. 32 वर्षीय गणेशने युवा मोहित काळेसोबत अन्य फलंदाजांच्या साथीने किल्ला लढवून विदर्भाला चारशेपार पोहोचविले. चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी गेलेला सतीश शेवटपर्यंत अभेद्‌य भिंतीप्रमाणे शेवटपर्यंत क्रीजवर उभा होता. त्यामुळेच दोनवेळचा विदर्भ या सामन्यात महत्त्वपूर्ण तीन गुणांची कमाई करू शकला. 

गणेशने विदर्भाकडून प्रथमच द्विशतकी खेळी करताना आपल्या नावावर विक्रमांचीही नोंद केली. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी तर ठरलीच, शिवाय 28 वर्षांपूर्वीचा विदर्भाकडून रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याचा माजी कर्णधार समीर गुजरचा विक्रमही मोडीत काढला. गुजरने 1991-92 मध्ये मध्य प्रदेशविरुद्‌ध नागपूरच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर 221 धावा फटकावल्या होत्या. विदर्भाकडून द्विशतक झळकाविणारा तो गुजर, फडकर, वसीम जाफर व फैज फजलनंतर पाचवा फलंदाज ठरला आहे. 

मुळ कर्नाटकतील दावणगिरी येथील असलेला गणेशने 2008-09 मध्ये रणजी पदापर्ण केले होते. 2010 मध्ये तामिळनाडूविरुद्ध चेन्नई येथे त्याने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकविले होते. 2011 मध्ये त्याने कर्नाटकचे नेतृत्व केले. तीन वर्षापूर्वी कर्नाटकने संधी नाकारल्यानंतर त्याने विदर्भात पाऊल ठेवले आणि तो संघातील अविभाज्य घटक बनला. रणजी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गणेशने केलेली ही शानदार खेळी अनेक अर्थाने संघासाठी फायद्‌याची ठरणार आहे. एकीकडे या खेळीने त्याचा आत्मविश्‍वास तर वाढेलच, शिवाय संघातील इरतही फलंदाज धावा काढण्यासाठी प्रेरित होतील. विशेषत: नवोदितांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. या स्पर्धेत गणेशची बॅट अशीच तळपत राहिली तर, विदर्भाचे रणजी करंडकात विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न नक्‍कीच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी अर्थातच गणेश व अन्य खेळाडूंना कामगिरीतील सातत्य कायम ठेवावे लागेल.


​ ​

संबंधित बातम्या