World Cup 2019 : मॅक्सवेल म्हणतो नेटमध्ये खेळतो स्टार्कला, कशाला घाबरू आर्चरला

मुकुंद पोतदार
Friday, 21 June 2019

आम्हाला जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान गोलंदाजीची भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. याचे कारण आम्ही नेट प्रॅक्टीसच्यावेळी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचे चेंडू खेळतो.

वर्ल्ड कप 2019 : आम्हाला जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान गोलंदाजीची भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. याचे कारण आम्ही नेट प्रॅक्टीसच्यावेळी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचे चेंडू खेळतो.
- ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू

वर्ल्ड कपमधील सर्वाधिक लक्षवेधी लढतीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. भारत संभाव्य विजेत्यांमध्ये आघाडीवर असला आणि स्पर्धेला सातत्यपूर्ण प्रारंभ केला असला तरी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही लढत जास्त महत्त्वाची आहे. याचे कारण ऑस्ट्रेलिया गतविजेते आहेत, तर इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल. याशिवाय इंग्लंड यजमान आहेत आणि वर्ल्ड कपनंतर दोन्ही संघ अॅशेसमध्ये आमनेसामने येणार आहेत. यामुळे या साखळी लढतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. सध्याच्या स्थितीनुसार एक तर उपांत्य किंवा अंतिम फेरीतही हे प्रतिस्पर्धी आमनेसामने येऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून त्यांचे खेळाडू बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ हे केवळ बॅटनेच बोलत आहेत. इंग्लीश प्रेक्षक त्यांची हुर्यो उडवित आहेत. प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी प्रेक्षकांच्या कोणत्याही टोकाच्या प्रतिक्रियेला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे वर्ल्ड कपपूर्वीच सांगितले होते.

मुख्य म्हणजे कांगारूंवर त्यांचेच स्लेजिंगचे म्हणजे शेरेबाजीचे अस्त्र उलटविणे तेवढे सोपे नसते. मॅक्सवेलचे वक्तव्य बघता कांगारूंना हे अस्त्र वापरण्यापासून (स्वतःलाच) रोखणे सुद्धा अवघड जाते असे म्हणता येईल.

ऐतिहासिक लॉर्डसवर येत्या मंगळवारी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. त्यावेळी नव्या चेंडूवर स्टार्क-कमिन्स आणि आर्चर-वूड यांची कामगिरी कशी होता हा महत्त्वाचा मुद्दा असेल. सामन्याचे पारडे त्यानुसार फिरू शकते.

आर्चरने गुरवारअखेर 12 विकेट घेतल्या आहेत. बहुतेक सामन्यांत त्याने सुरवातीला यश मिळविताना आपला लौकीक उंचावला आहे. मॅक्सवेलने आर्चरचे कौतुक सुद्धा केले आहे. तो विनासायस वेग साध्य करतो आणि तो कमालीचा चपळ अॅथलीट आहे, अशा शब्दांत त्याने या तेजतर्रार गोलंदाजाला दाद दिली आहेत. 

वेग कांगारूंच्या पथ्यावरच
मॅक्सवेल याने वेगवान गोलंदाजी कांगारूंच्या पथ्यावरच पडेल असेही ठामपणे सांगितले. ताशी 74 मैल वेगाने चेंडू टाकणाऱ्यांपेक्षा आर्चर-वूड यांच्या वेगाने आमचे फलंदाज रोमांचित होतील. तसा वेग आमच्या फलंदाजांना जास्त अनुकूल ठरतो. आम्ही या आव्हानाला सामोरे जाणअयाची तयारी नक्कीच केली असून आम्ही सज्ज आहोत. नेटमध्ये आम्हाला वेगवान चेंडूंवर नक्की पुरेसा सराव करण्याची संधी मिळते.

मॅक्सवेल हा कांगारूंचा एक्स-फॅक्टरवाला क्रिकेटपटू आहे. बांगलादेशविरुद्ध 10 चेंडूंत 32 धावा फटकावत त्याने आपले हे कौशल्य दाखवून दिले. उस्मान ख्वाजा याच्याशी कॉलवरून गल्लत होऊन तो रन आऊट झाला नसता तर त्याने आणखी तडाखा दिला असता. त्याने रुबेल हुसेनला दणका दिला. चौथ्या नंबरवर 45व्या षटकात तो मैदानावर उतरला होता. त्याने 46व्या षटकात केलेले आक्रमण निर्णायक ठरले. हुसेनकडून फ्री हिट मिळताच त्याने लाँग-ऑफला षटकार खेचले. मग कव्हरला त्याने चौकार मारला. हुसेनने स्लोअवर वन टाकल्यानंतरही डीप स्क्वेअर लेगला षटकार गेला. त्याने 320च्या स्ट्राइक रेटने दिलेला तडाखा ट्रेनिंग पॉइंट ठरतो.


​ ​

संबंधित बातम्या