महाराष्ट्राचा क्रिकेटमधील आठवावा प्रताप

ज्ञानेश भुरे
Friday, 11 October 2019

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा भारतीय क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीतून काढून घेतलेला अधिकार आणि त्याचवेळी त्यांच्याच यजमानपदाखाली पुणे येथे होणारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मागे वळून बघताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या देदिप्यमान कारकिर्दीची आठवण होते.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा भारतीय क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीतून काढून घेतलेला अधिकार आणि त्याचवेळी त्यांच्याच यजमानपदाखाली पुणे येथे होणारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मागे वळून बघताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या देदिप्यमान कारकिर्दीची आठवण होते. भले, महाराष्ट्राला प्रा. दि.ब देवधर यांच्यानंतर रणजी विजेतेपद मिळविता आलेले नाही. पण, त्यांनी एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू दिले हे कुणी नाकारणार नाही. यातील काही देशाचे प्रतिनिधीत्व करण्यात सुदैवी ठरले, तर काही दुर्दैवी. या क्रिकेटपटूंचे मैदानावीरल प्रताप महाराष्ट्राची शान उंचावणारे होतो. पण, सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रशासकांनी मौदनाच्या बाहेर केलेल्या प्रतापांनी महाराष्ट्राची मान झुकवली आहे.

Image may contain: 1 person

महाराष्ट्र क्रिकेटमध्ये गुणवत्ता नव्हती असे कधीच झाले नाही. सुरवातीपासून महाराष्ट्राने देशातील क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे. प्रा. दि. ब. देवधर यांच्या कालावधीत महाराष्ट्राने रणजी विजेतेपदाची चव देखील चाखली. त्यानंतर पुला खालून बरेच पाणी गेले. क्रिकेटमध्ये बदल होत गेले. क्रिकेट वाढले. महाराष्ट्र विजेतेपदापासून दूर राहिले. पण, त्यांच्या क्रिकेटपटूंनी देशातील क्रिकेटवर आपली छाप सोडली की त्याची आजही चर्चा होते. हे मान्य करायलाच हवे. क्रिकेट बदलले तसे भारतीय संघातून खेळण्याचे निकषही बदलत गेले. या सगळ्यात महाराष्ट्राचे काही क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळण्यात सुदैवी ठरले, तर काही दुर्दैवी.

Image may contain: 1 person, close-up

मधुसूदन रेगे, रंगा सोहोनी, चंदू बोर्डे, नाना जोशी, बाळ दाणी, चंदू गडकरी, वसंत रांजणे, यजुवेंद्र सिंग, हेमंत कानिटकर, हृषिकेश कानिटकर, इक्‍बाल सिद्दिकी असे खेळाडू भारतीय संघातून कसोटी क्रिकेट खेळले. अभिजित काळे आणि केदार जाधव हे एकदिवसीय क्रिकेट खेळले. काळेची कारकिर्द संपली, तरी केदार आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचा प्रमुख खेळाडू आहे. या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळांडूमध्ये नाना जोशी वगळता अन्य खेळाडू भारताकडून खेळलेल्या सामन्यांचा दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. त्याचबरोबर प्रा. दि. ब. देवधर, भाऊसाहेब निंबाळकर, विजय भोसले, पांडुरंग साळगांवकर, मिलिंग गुंजाळ, सुरेंद्र भावे, शंतनु सुगवेकर, संतोष जेधे अशी काही नावे आहेत की जे खेळाडू गुणवत्ता असूनही भारतीय संघापासून दूर राहिले.

Image may contain: 1 person

यामध्ये, प्रा. देवधर यांच्याबद्दल एकच म्हणता येईल की भारतीय संघाला कसोटी दर्जा मिळेपर्यंत ते वयस्क झाले होते. त्यामुळे त्यांना कसोटी क्रिकेट खेळता आले नाही. पण, भाऊसाहेब निंबाळकर, विजय भोसले, पांडुरंग साळगांवकर ही नावे जुन्या काळातील असली, तरी त्यांचा देशांतर्ग क्रिकेटमध्ये दबदबा होता. भाऊसाहेबांनी 1948 मध्ये काठेवाड संघाविरुद्ध केलेली 443 धावांची वैयक्तिक खेळी आजही विक्रम म्हणून आबाधित आहे. विजय भोसले हे देखिल असेच आक्रमक फलंदाज होते. साळगांवकर यांच्याबद्दल तर काय बोलावे. ज्या वेळी भारतात वेगवान गोलंदाज अभावाने सापडत होते, तेव्हा त्यांची गोलंदाजी आग ओकत होती. मुख्य म्हणजे त्यांची फलंदाजी देखील आक्रमक होती. अजोड अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. भोसले आणि साळगांवकर यांच्याबाबत एक म्हणता येईल की त्यांच्या कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेट असते, तर ते नक्कीच चमकले असते.

Image may contain: 1 person, standing and indoor

सदानंद मोहोळ या आणखी एका गुणी खेळाडूबद्दल बोलायचे राहिले. वेगवान गोलंदाज ही त्यांची ओळख सार्थ होती. वेगवान गोलंदाजाने लावलेली "अंब्रेला' क्षेत्ररचना ही त्या काळात चर्चेचा विषय ठरली होती. तशी रचना पुढे भारतीय गोलंदाजांनी केलेली आठवत नाही. त्यांना 1967 मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळाले. पण, त्यांना एकही कसोटी खेळता आली नाही. त्यानंतरच्या कालावधीत मिलिंद गुंजाळ या खेळाडूवर अन्याय झाला. भारतीय संघात झालेली त्यांची निवड अगदी ऐनवेळी रद्द करण्यात आली. सुरेंद्र भावे, शंतनु सुगवेकर, संतोष जेधे या खेळाडूंनाही राष्ट्रीय संघाचे दरवाजे कधीच उघडले नाहीत. या सर्व क्रिकेटपटूंच्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ होती. महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंकडे नक्कीच आदराने बघितले जात होते.

Image may contain: 1 person, close-up

पण, सत्तेच्या लालसेपोटी काही प्रशासकांनी महाराष्ट्र क्रिकेटची मान झुकवली. कारण म्हटले तर अगदी साधे आहे. "बीसीसीआय'वर सर्वोच्च न्यायालयाचे वर्चस्व असताना त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेलाच आव्हान देण्याचे काम केले. हा अगदी अलिकडा भाग झाला. पण, जुनी सत्ता उलथवून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा ताबा घेताना ठेवलेल्या उद्दिष्टांशी त्यांनी फारकत घेतली ही सर्वात मोठी चूक त्यांनी केली. महाराष्ट्राच्या क्रिकेटवर प्रभाव टाकणारे पुण्यातील क्रिकेटच त्यांनी संपवून टाकले. नाही म्हणायला त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम दिले. भारतीय क्रिकेट मंडळातील स्थान त्यांनी गमावले आहे. आता त्यांना यातून बाहेर पडून जायचे आहे. तडजोड किंवा कुणाची मध्यस्थी स्विकारून त्यांनी सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. नाही, तर महाराष्ट्राच्या क्रिकेट आणि क्रिकेटपटूला वाली राहणार नाही. एकदा तरी त्यांनी महाराष्ट्राची शान उंचावणाऱ्या क्रिकेटपटूंचा प्रताप आठवावा आणि त्यांच्यासाठी एक पाऊल मागे जाऊन आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या