कोल्हापुरात खेळाडूंनीच बनवले स्वखर्चातून मैदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 June 2019

कोल्हापूर - आर. के. नगर येथील खेळाडू एकत्र आले. त्यांनी आर. के. स्पोर्टस नावाची ॲकॅडमी सुरू केली. एवढेच नव्हे तर स्वतःचे पैसे आणि समाजातील दानशूरांची मदत घेऊन एक चांगले मैदानही बनवले आहे. यामुळे पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, आर. के. नगर येथील मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान मिळाले. 

कोल्हापूर - आर. के. नगर येथील खेळाडू एकत्र आले. त्यांनी आर. के. स्पोर्टस नावाची ॲकॅडमी सुरू केली. एवढेच नव्हे तर स्वतःचे पैसे आणि समाजातील दानशूरांची मदत घेऊन एक चांगले मैदानही बनवले आहे. यामुळे पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, आर. के. नगर येथील मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान मिळाले. 

जिद्द आणि आत्मविश्‍वास हे खेळाडूंचे वैशिष्ट्य असते. कोणताही प्रश्‍न, समस्या समोर आली तरी त्यातून ते मार्ग काढतात. याचे उदाहरण पाहायचे असेल तर आर. के. नगर येथील गणपती मंदिराच्या समोर असणाऱ्या टेकडीच्या पायथ्याला बनवलेले मैदान पाहावे. एकेकाळी ओबडधोबड माळ असणारी ही जागा आता सपाट मैदानात रूपांतरित झाली आहे. याचे सारे श्रेय आर. के. स्पोर्टस्‌चे खेळाडू, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींना जाते.  

आर. के. नगरमध्ये पूर्वी बरीच जागा ओसाड माळ होती. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी कधी मैदानाची अडचण आली नाही; पण जशी लोकवस्ती वाढली तशी खेळण्यासाठी चांगले क्रीडांगण असण्याची गरज निर्माण झाली.

दरम्यान आर. के. नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे खेळणारी मुले एकत्र येऊन त्यांनी आर. के. स्पोर्टस्‌ फुटबॉल क्‍लब नावाची टीम स्थापन केली. ही मुले गणपती मंदिरासमोर असणाऱ्या टेकडीच्या खाली असणाऱ्या ओबडधोबड माळावर फुटबॉलचा सराव करत होती. उत्तम दर्जाची फुटबॉल टीम बनवायची असेल तर चांगले मैदान असण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी या जागी मैदान तयार करण्याचे ठरवले. यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी देऊन जमवला. तसेच संग्राम पाटील, सतीश नलवडे, अशोक रजपूत, मिलिंद शेटे, आयाज डांगे, शैलेश राजेशिर्के यांनी यंत्रासह सर्वप्रकारची मदत केली. सुमारे एक लाख रुपयांचा खर्च करून २००९ मध्ये हे चांगले मैदान बनवले गेले. 

आज या मैदानाचा उपयोग फुटबॉल टीमच्या खेळाडूंना तर होतोच; पण मोरावाडी, पाचगाव, कंदलगाव आणि आर. के. नगर येथील मुले इथे खेळण्यास येतात. तसेच काही मुले फुटबॉलचे धडेही इथे गिरवतात. विजय शिंदे, गजानन मनगुतकर, रवींद्र शेळके त्यांना प्रशिक्षण देतात. सकाळी काही जण इथे फिरायला आणि व्यायामालाही येतात. या सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन या ठिकाणी एक चांगले क्रीडांगण बनवून लोकोपयोगी काम केले आहे. 

खेळामुळे व्यायाम होतोच; पण क्रीडाक्षेत्रात आता करिअरच्या चांगल्या संधीही उपलब्ध आहेत; पण त्यासाठी मैदान असण्याची आवश्‍यकता आहे. आम्ही बनवलेल्या मैदानाचा अनेकांना उपयोग होतो. या मैदानावर सराव करून भविष्यात आर. के. नगर मधूनही चांगले खेळाडू घडतील. 
- गजानन मनगुतकर,
प्रशिक्षक.


​ ​

संबंधित बातम्या