कुमार राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स - रचनाने मोडला टिंटु लुकाचा विक्रम

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

- हरियानाच्या रचना हिने  800 मीटर शर्यतीत 2 मिनिट 6.12 सेकंदाच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. 

- तिने या कामगिरीसह टिटु लुकाचा 11 वर्षे जुना 2 मिनिट 7.48 सेकंदाचा विक्रम मोडून काढला

- स्पर्धेच्या चौथ्या दिवशी 16 वर्षांखालील गटात दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद झाली.

गुंटूर ः हरियानाच्या रचना हिने स्वप्नवत कामगिरी करताना कुमार राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत मंगळवारी 800 मीटर शर्यतीत 2 मिनिट 6.12 सेकंदाच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. 
तिने या कामगिरीसह टिटु लुकाचा 11 वर्षे जुना 2 मिनिट 7.48 सेकंदाचा विक्रम मोडून काढला. टिंटुने 2008मध्ये म्हैसूर येथे ही कामगिरी केली होती. मात्र तिला 20 वर्षांखालील गटात टिंटुचाच 2 मिनिट 5.21 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडता आला नाही. टिंटुने त्याचवर्षी हा विक्रम नोंदविला होता. 
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी 16 वर्षांखालील गटात दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद झाली. हरियानाच्या परवेज खान याने 800 मीटर शर्यतीत 1मिनिट 54.78 सेकंद अशी वेळ देत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने बिरेन गोगोई याने 28 वर्षापूर्वी नोंदविलेला 1 मिनिट 55.70 सेकंदाचा विक्रम मोडित काढला. दुसरा राष्ट्रीय विक्रम मुलींच्या 3 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत उत्तराखंडच्या रेश्‍मा पटेल हिने नोंदविला. तिने निर्विवाद वर्चस्व राखताना 14 मिनिट 14.83 सेकंद अशी नवी सहरस विक्रमी वेळ दिली. यापूर्वीचा विक्रम 1990 मध्ये ए. कुमारी (14 मिनिट 28.10 सेकंद) हिने नोंदविला होता. उत्तराखंडच्याच रोजी पटेल हिने 20 वर्षांखालील गटात 10 हजार मीटर चालण्याची शर्यत जिंकली. 
महाराष्ट्राच्या प्रकाश गदादेला सुवर्ण 
महाराष्ट्राने आज एका सुवर्णपदकासह एक रौप्य आणि दोन ब्रॉंझपदके मिळविली. मुलांच्या 18 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्राच्या प्रकाश गदादे याने 1 मिनिट 53.10 सेकंद वेळ देत 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. मुलींच्या विभागात याच शर्यतीत महाराष्ट्राची शिवेच्छा पाटील (2 मिनिट11.67 सेकंद) रौप्यपदकाची मानकरी ठरली. केरळच्या प्रिसिला डॅनिएल हिने सुवर्णपदक मिळविले. मुलांच्या 14 वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा पवन कुमार पंगी 1829 गुणांसह ट्रायथलॉन प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी रला. मुलींच्या गटातही गायत्री कसुल्ला 1890 गुणांसह ब्रॉंझपदकाचीच मानकरी ठरली. 


​ ​

संबंधित बातम्या