प्रो-कबड्डी - हरियाना, दिल्लीचे "प्ले-ऑफ'वर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

-  हरियाना स्टिलर्सने नवोदित खेळाडूंना साथीला घेत यंदाच्या प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील "प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्‍चित केला.

- हरियानातील टप्प्यात आज झालेल्या सामन्यातील विजयाने दिल्लीने पहिले, तर हरियानाने तिसरे स्थान भक्कम केले

- गुजरात आणि पुणे संघांचा यंदाच्या मोसमातील प्रवासाला आजच पूर्णविराम मिळाला

पंचकुला - हरियाना स्टिलर्सने नवोदित खेळाडूंना साथीला घेत यंदाच्या प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील "प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्‍चित केला. चुरशीने झालेल्या सामन्यात रविवारी त्यांनी गुजरात फॉर्च्युन जाएंटस संघाचा 38-37 असा पराभव केला. आधी झालेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटण संघाचा 60-40 असा धुव्वा उडवला. 
हरियानातील टप्प्यात आज झालेल्या सामन्यातील विजयाने दिल्लीने पहिले, तर हरियानाने तिसरे स्थान भक्कम केले. त्याचवेळी गुजरात आणि पुणे संघांचा यंदाच्या मोसमातील प्रवासाला आजच पूर्णविराम मिळाला. आतापर्यंत या मोसमात दिल्ली, हरियानासह बंगाल वॉरियर्सने "प्ले-ऑफ' प्रवेश निश्‍चित केला आहे. 
हरियानाच्या विजयात विकास कंडोला याचे सातत्य कमालीचे दिसून आले. प्रशांत राय, विनय यानी चढाईत साथ दिल्यावर सुनील आणि धर्मराज चेर्लाथन यांनी बचावातील काम चोख पार पाडून गुजरातला रोखून दिले. गुजरातचे असेही आव्हान संपुष्टात आले होते. मात्र, त्यांनी उत्तरार्धात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेली धडपड सामन्यात चुरस निर्माण करणारी ठरली. रोहित गुलिया, सोनू आणि परवेश भैन्सवाल यांनी आज चमक दाखवली. बचावात 13-11 अशी आघाडी घेऊनही चढाईत 23-18 अशी पिछाडी त्यांच्या पराभवाचे कारण ठरली. 
पुण्याचे आव्हान संपुष्टात 
त्यापूर्वी, झालेल्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने गुणांचा सपाटा लावत पुणेरी पलटण संघाचे आव्हान संपुष्टात आणले. एक नाही, दोन नाही, तर तब्बल चार लोण देत त्यांनी पुणे संघावर निर्विवाद वर्चस्व राखले. 
त्यांच्या वर्चस्वात अर्थातच नविनकुमारच्या चढायांचा मुख्य वाटा होता. त्याला नेहमी प्रमाणे चढायात चंद्रन रणजितची साथ मिळाली. दोघांनी "सुपर टेन' कामगिरी केली. बचावात अनुभवी रवी पहल याने "हाय फाईव्ह' करताना सहा गुण मिळविले. दिल्लीने अदला बदली करत आज नऊ खेळाडू खेळविले. या प्रत्येकाने किमान एक तरी गुण मिळवला. तुलनेत पुणे संघाला बचावातील चांगल्या कामगिरीचे समाधान तेवढे मिळाले. त्यांच्याकडून बाळा जाधव याने पकडीचे सहा गुण मिळविले. चढाईत नितीन तोमरचे सात गुण वगळता पुण्याचा अन्य खेळाडू चमक दाखवू शकला नाही. 


​ ​

संबंधित बातम्या