World Cup 2019 : आर्चरचा बॉउन्सर चांगलाच भोवला; आमला जाणार संघाबाहेर
दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज हाशिम आमला दुखापतग्रस्त असल्याने शनिवारी सरावात सहभागी होऊ शकला नाही.
वर्ल्ड कप 2019 : लंडन : दक्षिण आफ्रिका संघाची विश्वकरंडक मोहिम सुरू असून खेळाडू सरावात सहभागी होताना दिसत आहेत. मात्र, सलामी फलंदाज हाशिम आमला दुखापतग्रस्त असल्याने शनिवारी सरावात सहभागी होऊ शकला नाही.
विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आमलाला मैदान सोडावे लागले होते. जोफ्रा आर्चरने 90 किमी वेगाने टाकलेला एक चेंडू डोक्याला लागल्याने आमला दुखापतग्रस्त झाला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेसन रॉय, जो रूट, इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 8 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डीकॉकने 68 धावांची खेळी केली. मात्र, लियाम प्लंकेटने डीकॉकला बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 15 धावांत 3 बळी गमावले. त्यानंतर 207 धावांत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले.
दुखापत झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आमला मैदानात उतरला खरा, पण त्याला फक्त 12 धावाच करता आल्या. रविवारी 'द ओव्हल' येथे दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
अहवालात म्हटल्याप्रमाणे, आमला शनिवारी लंडनमधील एका हॉटेलमध्ये टीम मॅनेजर आणि डॉक्टर मोहम्मद मूसाजी यांच्यासोबत राहिला होता. त्यांच्यासोबत आमलाने तंदुरुस्तीबाबत चर्चा केली.
जर आमला तंदुरुस्त झाला नाही, तर डेव्हिड मिलरला मुख्य संघात स्थान मिळेल. मिलर हा मधल्या फळीत फलंदाजी करेल. एडेन मार्क्रम डीकॉकसोबत सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. तसेच वेगवान गोलंदाज डेल स्टेनलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे अगोदरच संघातून बाहेर असून इंग्लंडविरुद्धचा सामनाही तो खेळू शकला नव्हता.