सुवर्णचौकाराच्या वेळी, हिमाची कामगिरीतही सुधारणा

वृत्तसंस्था
Friday, 19 July 2019

-  हिमा दासने 15 दिवसांतील 200 मीटर शर्यतीतील चौथे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.

- हे यश मिळवताना तिने सलग दुसऱ्या शर्यतीत कामगिरीत केलेली सुधारणा जास्त मोलाची आहे.

नवी दिल्ली : हिमा दासने 15 दिवसांतील 200 मीटर शर्यतीतील चौथे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. हे यश मिळवताना तिने सलग दुसऱ्या शर्यतीत कामगिरीत केलेली सुधारणा जास्त मोलाची आहे.

हिमाने चेक प्रजासत्ताकमधील ताबोर ऍथलेटिक्‍स स्पर्धा शर्यत जिंकताना 23.25 सेकंद वेळ दिली. तिला शर्यतीत फारसे आव्हान नव्हते. चेक प्रजासत्ताकच्या क्‍लबमधील स्पर्धकांबरोबर तिची चुरस होती. त्यानंतरही तिची वेळ तिच्या 23.10 सेकंद या सर्वोत्तम कामगिरीनजीक जाणारी आहे. तिची सहकारी व्ही. के. विस्मया हिने रौप्यपदक जिंकले. तिने मोसमातील सर्वोत्तम वेळ देताना 23.43 सेकंद अशी कामगिरी केली. 

एकोणीस वर्षीय हिमाचे 2 जुलैपासूनचे हे चौथे सुवर्णपदक. दुसऱ्या शर्यतीच्या वेळी तिची कामगिरी खालावली; पण हा अपवाद वगळता कामगिरीत सुधारणा झाली आहे. पोझनान स्पर्धेत (2 जुलै) तिने 23.65 सेकंद वेळ दिली होती. त्यानंतर तिने कुतनो स्पर्धेत (7 जुलै) सुवर्णपदक जिंकले, त्या वेळी तिची वेळ 23.97 सेकंद अशी खालावली. पण, तिने 13 जुलै रोजी झालेल्या क्‍लादनो स्पर्धेत 23.43 सेकंद वेळेपर्यंत प्रगती केली. आता चार दिवसांत कामगिरीत 0.33 सेकंदाने सुधारणा केली आहे.

हिमाने हे यश मिळवले असले तरी तिच्या आवडत्या 400 मीटर शर्यतीत तिला जागतिक पात्रता साधता आलेली नाही; तसेच ही कामगिरी अद्याप 200 मीटरमध्येही झालेली नाही. जागतिक स्पर्धेसाठी 200 मीटरची पात्रता वेळ 23.02 सेकंद आहे; तर 400 मीटरसाठी 51.80 सेकंद. 

मोहम्मद अनास याने पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने 45.40 सेकंद अशी वेळ नोंदवली. त्याने 13 जुलै रोजी क्‍लादनो शर्यतीत सुवर्णपदक जिंकत जागतिक पात्रता साध्य केली आहे. त्या वेळी त्याची वेळ 45.21 सेकंद होती. या वेळी त्याने जागतिक पात्रतेपेक्षा (45 सेकंद) जास्त वेळ घेतली. दरम्यान या शर्यतीत भारतीयांनीच पहिले चार क्रमांक मिळवले. मोसमात सर्वोत्तम वेळ नोंदवलेला तोम नोह निर्मल (46.39 सेकंद) दुसरा आला. के. एस. जीवन (46.60 सेकंद) आणि एम. पी. जबीर (476.16 सेकंद) अनुक्रमे तिसरे व चौथे आले.


​ ​

संबंधित बातम्या