आता पुढची "धाव'पुण्यात ! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉननिमित्त रविवारी साताऱ्यातील धावपटूंसाठी प्रोमोरन उत्साहात संपन्न झाली.

सातारा ः गुलाबी थंडी, कोवळे ऊन, निरभ्र आकाश अशा प्रसन्न वातावरणात आज लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सातारकरांनी धावण्याचा आनंद लुटत बालेवाडी (पुणे) येथे 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.

ताज्या बातम्यांसाठी ई- सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

सातारा रनर्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने साताऱ्यातील धावपटूंसाठी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनची प्रोमोरन आयोजित करण्यात आली होती. या रनमध्ये शेकडो आबालवृद्ध सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर, सहायक व्यवस्थापक (वितरण) तानाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रोमोरनचा फ्लॅग ऑफ झाला. त्यानंतर धावपटूंनी राजवाड्याकडे कूच केली.

अवघ्या काही मिनिटांत एकेक धावपटू शाहू चौकात पोचत होता. तेथून राजपथावरून गोलबागेला वळसा घालून मोती चौकमार्गे कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावर जात होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले नागरिक धावपटूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहित करीत होते. यावेळी लहान मुले हरखून जात होती. अंतिम टप्प्यापर्यंत धावपटूंनी निर्धारित केलेल्या वेळेत पोचण्यासाठी ते पोलिस मुख्यालयापासून धावण्याचा वेग वाढवत होते. फिनिश लाइनवर पोचताच त्यांच्या चेहऱ्यावर प्रोमोरन पूर्ण केल्याचा आनंद विलसत होता. 

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी वाढविला उत्साह 

दरम्यान, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ""या मॅरेथॉनचे आणि माझे एक वेगळे असे नाते आहे. गतवेळी आमच्या सहकाऱ्यांनी या मॅरेथॉनमधील कमिशनर करंडक पटकावला होता. या स्पर्धेचे नियोजन अत्यंत नीटनेटके असते. त्यामुळे या स्पर्धेत धावपटूंनी सहभागी होऊन आपला कस सिद्ध करावा.'' 

आम्ही केलाय निर्धार

यावेळी डॉ. सुचित्रा काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ""बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन केवळ रुटच छान नाही तर स्टार्टिंग आणि फिनिश पॉइंटवर धावपटूंना क्रीडारसिकांचे खूप प्रोत्साहान मिळते. आम्ही यंदा या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे निश्‍चित केले आहे.'' यावेळी डॉ. पल्लवी पिसाळ, भविका मुथा आदींनी ही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या प्रोमोरनमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला होता.

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या