World Cup 2019 : सर्फराज, पंतप्रधानांच ऐकलं नाही म्हणूनच हसं झालं

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही या सामन्याकडे विशेष लक्ष दिले आहे. ​

वर्ल्ड कप 2019 : ओल्ड ट्र्रॅम्फर्ड : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला सामना आज (रविवार) खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही या सामन्याकडे विशेष लक्ष दिले आहे. 

हा सामना सुरू होण्यापूर्वी इम्रान यांनी कर्णधार सर्फराज खानला ट्विटरद्वारे एक मोलाचा सल्ला दिला आहे. नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी घेण्याचा सल्ला त्यांनी पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराजला दिला होता. मात्र, सर्फराजने नाणेफेक जिंकूनही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इम्रान यांचा सल्ला सर्फराजने डावलल्याने सध्या समाज माध्यमांवर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे.

जवळपास तीन दशकांपूर्वी पाकिस्तानचे स्टार क्रिकेटपटू असलेल्या इम्रान यांनी भारतापुढे लक्ष्य उभे करण्यासाठी आपला संघ तयार आहे, असा विश्वास दर्शविला होता. सर्फराज चांगल्या फलंदाज आणि गोलंदाजांची निवड करतो. पाकिस्तानच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरोधात त्याने नक्की विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. खेळपट्टीवर दव असल्यास त्याने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडावी, असे इम्रान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कदाचित हे ट्विट सर्फराजने वाचले नसल्याने त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला असावा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सर्फराजची चांगलीच खिल्ली उडविली आहे.  

पुढे ते म्हणाले, भारत विजयाचा प्रमुख दावेदार असला तरी तुम्ही अखेरपर्यंत लढत राहा. पराभवाला घाबरू नका. प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करायचं असेल, तर मैदानावर उतरताना मानसिकरित्या कणखर आणि सक्षम असायला हवं. जसजसा सामना शेवटाकडे येईल, तशी या सामन्यात रंगत वाढत जाईल. त्यामुळे खेळाडूंनी आपली मानसिकता ढळू न देता सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करावे आणि सामना संपल्यावर येणारा निकाल खिलाडूवृत्तीने स्वीकारावा, असे शेवटच्या ट्विटमध्ये इम्रान यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या