AUSvsIND : विराटसाठी रणनीती तयार : लॅंगर
'भारतीय कर्णधाराबाबत आदरच; पण त्याची विकेटही महत्त्वाची'
ऍडलेड : क्रिकेटविश्वातील सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जात असलेल्या विराट कोहलीबाबत आम्हाला आदर आहेच. परंतु पहिल्या कसोटीसाठी आम्ही त्याच्यासाठी रणनीती तयार केली आहे, असे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी सांगितले. भारताविरुद्धच्या बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास येत्या गुरुवपासून सुरुवात होत आहे.
AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड
विराट कोहली हा सामना खेळल्यानंतर पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी परतणार आहे. तो केवळ या पहिल्या सामन्यात खेळणार असला, तरी ऑस्ट्रेलियाने कोहलीला बाद करण्यासाठी तयारीत कोणतीही कसर ठेवलेली नाही. कोहलीवर वर्चस्व मिळवून आम्हाला कसोटी मालिकेची दिशा निश्चित करता येईल, असे लॅंगर यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणतात, तो सर्वोत्तम खेळाडू आणि तेवढाच ग्रेट कर्णधारही आहे. त्याच्याविषयी माझ्या मनात मोठा आदर आहे. त्याची विकेट आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आम्ही कडेकोट रणनीती तयार केली आहे.
दशकातील टी-ट्वेन्टी संघात धोनी नाही; आकाश चोप्राने निवडला अजब कॅप्टन
तयार केलेल्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे. विराटला धावा करू न देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. विराटचा खेळ आम्ही बारकाईने पाहिलेला आहे, तसाच त्यानेही आमचा चांगला अभ्यास केलेला असेल, असे लॅंगर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
स्लेजिंगचा आधार घेणार नाही...
विराटला बाद करण्यासाठी आम्ही कौशल्याचा वापर करू स्लेजिंग किंवा शेरेबाजीचा आधार घेणार नाही. विराटला उद्देशून शेरेबाजी करा किंवा करू नका, त्याचा परिणाम विराटवर होत नसतो. खेळात आक्रमकता असतेच. पण आम्ही मर्यादा ओलांडणार नाही. आमच्या बाजूने तरी आम्ही हे सांभाळू, असे लॅंगर यांनी स्पष्ट केले.
अनुभव असला तरीही...
भारतापेक्षा आमच्याकडे प्रकाशझोतात कसोटी सामने खेळण्याचा अनुभव अधिक असला, तरी पहिल्या कसोटीत दोघांनाही समान संधी असेल. सर्वश्रेष्ठ खेळाडू किंवा संघ यांना कोणत्या चेंडूने खेळतोय, याचा फरक पडत नसतो. समोर असलेल्या परिस्थितीशी ते लगेचच एकरूप होत असतात. या कसोटीसाठी भारतीय संघ केवळ तीन दिवसांचा प्रकाशझोतातील सराव सामना खेळला आहे तर आम्ही सातत्याने सराव करत आहोत. पण आम्हीसुद्धा 12 महिने कसोटी खेळलेलो नाही. त्यामुळे इतिहास काहीही असला, तरी पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ एकाच पातळीवर आहेत, असे लॅंगर यांनी आवर्जून सांगितले.
'बदला' हा शब्द योग्य नाही...
गेल्या दौऱ्यात भारताने मालिका जिंकली होती. त्यामुळे या वेळी तुम्ही बदला घेणार का, याबाबत बोलताना लॅंगर यांनी, मुळात 'बदला' शब्द आपल्याला आवडत नाही. क्रिकेटमधील एक चांगले द्वंद असे तुम्ही म्हणू शकता. आयपीएलमध्ये एकत्रितपणे खेळत असल्यामुळे खेळाडूंमध्ये मित्रत्वाची भावना तयार झाली आहे, असे त्यांनी सांगितले.