लेट पण थेट! भाजप नेत्याच्या 'गूगली'वर हनुमाचा सिक्सर
हनुमा विहारी आणि अश्विननं जिगरबाज खेळी करुन ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सिडनी कसोटी सामना अनिर्णित केला. या सामन्यात पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर हनुमा विहारीनं संयम काय असतो याचे उदाहरण दाखवून दिले.
हनुमा विहारी आणि अश्विननं जिगरबाज खेळी करुन ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सिडनी कसोटी सामना अनिर्णित केला. या सामन्यात पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर हनुमा विहारीनं संयम काय असतो याचे उदाहरण दाखवून दिले. अश्विनने त्याला तितक्याच नेटाने साथ दिली. भारतीय संघावर आणि खास करुन हनुमा-अश्विनच्या खेळीवर सामना संपल्यानंतर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.
कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शंभर चेंडू खेळून एकेरी धावसंख्येवर बॅटिंग करणाऱ्या हनुमावर भाजप नेते आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकीय तोऱ्यात टीका केली होती. 109 चेंडू खेळून हनुमा विहारीने 7 धावा केल्या. त्याची ही खेळी खूप संथ आहे. यामुळे भारतीय संघाची ऐतिहासिक विजयाची संधी तर हुकलीच शिवाय विहारीनं क्रिकेटची हत्या केली. असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले होते. यावर आता हनुमानं रिप्लाय दिला आहे. त्याने केवळ दोन शब्दांत यावर प्रतिक्रिया देत भाजप नेत्याची बोलतीच बंद केली आहे.
ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी
Playing 109 balls to score 7 !That is atrocious to say the least•Hanuma Bihari has not only killed any Chance for India to achieve a historic win but has also murdered Cricket.. not keeping win an option, even if remotely, is criminal.
PS: I know that I know nothing abt cricket— Babul Supriyo (@SuPriyoBabul) January 11, 2021
हनुमा विहारीनं सिडनी कसोटीच्या दोन दिवसानंतर लेट पण थेट भाजप नेत्याची फिरकी घेतली आहे. 'हनुमा विहारी' असं आपल स्वत:च नाव लिहून त्याने भाजप नेत्याने जे ट्विट केलं होत त्यात आपलं नाव चुकीच होतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेटमधील मला काही कळत नसलं तरी हनुमाची खेळी भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात अडथळा आणणारी होती असा दावा करणाऱ्या भाजप नेत्याला संयमी आणि शांत पद्धतीने उत्तर देत शांत करण्याचा प्रकारच हनुमाने केलाय.
बाबुल सुप्रियो यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की, हनुमाने थोडा प्रयत्न करुन खराब चेंडूचा समाचार घेतला असता तरी आपण मॅच जिंकली असती. पंतने अपेक्षा नसताना चांगली खेळी केली. हनुमानेही तशीच खेळी करायला हवी होती, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 407 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवशी भारतीय संघाने 98 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. पाचव्या दिवशी 98 धावांवरुन डाव पुढे नेताना अजिंक्य रहाणे, पुजारा आणि पंत यांच्या विकेटनंतर दिवसाअखेर भारतीय संघाने 5 बाद 334 धावा करत सामना अनिर्णित राखला. हनुमा- अश्विन यांनी दाखवलेल्या संयमामुळे भारताचा पराभव टळला होता.