AUSvsIND T20 : वनडेचा तेवर जिरवला; टीम इंडियाचा कांगारूंवर विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करत विजय मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर आज कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर 11 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 ने आघाडी घेतली आहे. आजच्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 20 षटकांत 161 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत सात गडी गमावत 150 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर भारतीय संघाची सुरवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा सहा चेंडूंचा सामना केल्यानंतर मिचेल स्टार्कचा बळी ठरला. धवन केवळ एक धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांची भागीदारी होत असतानाच कोहली स्विप्सनचा शिकार झाला. कोहलीला स्विप्सनने अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ संजू सॅमसनच्या रूपात भारताची तिसरी विकेट पडली. संजू सॅमसनने 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याला हेनरिक्सने स्विप्सन करवी झेलबाद केले.
सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या देखील आजच्या सामन्यात लवकर बाद झाले. पहिल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला हेनरिक्सने स्मिथ कडे झेलबाद केले. हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 16 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाने आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 23 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करू शकला.
भारतीय संघातील नवख्या गोलंदाजाची सेहवागने केली प्रशंसा
त्यानंतर भारताने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात चांगली झाली होती. सलामीवीर फिंच (35) आणि शॉर्ट (34) यांनी पहिल्या विकेट साठी 56 धावांची भागीदारी केली होती. मात्र ही जोडी यूजवेंद्र चहलने फोडून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने फिंचला 35 धावांवर पांड्या करवी झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 12 धावांवर स्मिथला देखील चहलने माघारी धाडले. स्टीव्ह स्मिथच्या नंतर ग्लेन मॅक्सवेलला नटराजनने अवघ्या दोन धावांवर बाद केले. त्यानंतर हेनरिक्स क्रिझवर पाय रोवत असतानाच त्याला दीपक चाहरने पायचीत केले. हेनरिक्सने 20 चेंडूत 30 धावा केल्या. हेनरिक्स नंतर टिकून राहिलेला सलामीवीर शॉर्टला नटराजनने पांड्या करवी झेलबाद केले. शिवाय वेड आणि स्टार्क देखील लगेच बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत सात गडी गमावत 150 धावाच करू शकला.
INDIA WIN BY 11 RUNS
What a sensational comeback after being 92/5 in their innings!#AUSvIND SCORECARD https://t.co/FpDYCXHojX pic.twitter.com/FfvQUSIzlN
— ICC (@ICC) December 4, 2020
दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या टी नटराजन तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील लक्षणीय कामगिरी केली होती. त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आजच्या टी 20 सामन्यात देखील त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत तीन बळी मिळवले आहेत. टी नटराजनने 4 षटकात 30 धावा देत तीन विकेट्स मिळवल्या. तर चहलने देखील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. त्याने 25 धाव देऊन तीन गडी टिपले. याशिवाय दीपक चाहरने एक विकेट घेतली.