व्हाईटवॉश टळला; टी20 मालिकेपूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावणारा विजय  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना आज कॅनबेरामध्ये खेळवण्यात आला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना आज कॅनबेरामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया समोर 303 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघ सर्वबाद 49.3 षटकांत 289 धावाच करूच शकला. आणि त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 13 धावांनी विजय मिळवला आहे.   

AUSvsIND : तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने रचला इतिहास  

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे. यापूर्वीचे पहिले दोन सामने जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिका आपल्या खिशात घातली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि निर्धारित 50 षटकांत विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांच्या मदतीने 5 गडी गमावून 302 धावा केल्या होत्या. 

त्यानंतर कांगारू संघाच्या वतीने कर्णधार फिंच आणि मॅक्सवेलने अर्धशतक ठोकले. मात्र तरीदेखील त्यांना सामना जिंकता आला नाही. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा नेहमीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त असल्यामुळे डावाची सुरवात फिंच आणि मार्नस लबूशेनने केली. त्यानंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या टी नटराजनने लबूशेनला बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला अवघ्या सात धावांवर शार्दूल ठाकूरने माघारी धाडले. 

पांड्याची गाडी नव्वदीतच अडकली; पहिल्या ODI शतकाची प्रतिक्षा कायम

यानंतर हेनरिक्स आणि ग्रीन हे देखील फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. मात्र त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने आजच्या सामन्यात देखील अर्धशतक नोंदवले. त्याने 38 चेंडूत 59 धावा केल्या. मॅक्सवेलला जसप्रित बुमराहने बाद केले. मॅक्सवेल माघारी गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित खेळाडू झटपट बाद झाले. भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, जसप्रित बुमराह आणि टी नटराजन या दोघांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले. व कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट्स घेतली.          

दरम्यान, यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.   


​ ​

संबंधित बातम्या