AUSvsIND T20 : 'वन डे'तील विजय प्रेरणादायी ठरणार? 

शैलेश नागवेकर
Friday, 4 December 2020

भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून ट्‌वेन्टी-20 मालिकेचा थरार 

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली असली तरी अखेरच्या सामन्यात मिळवलेला विजय ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाला प्रेरणादायी ठरणार का? आयपीएलमघ्ये विविध संघांतून चमकलेले हे स्टार खेळाडू आता एकत्रितपणे कशी कामगिरी करतात यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ज्या मैदानावर बुधवारी विजय मिळवला तेथेच पहिला ट्‌वेन्टी-20 सामना होणार आहे ही भारतासाठी जमेची बाजू आहे. 

AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी  

परदेश दौऱ्यावर भारतीय संघाला 'स्लो स्टार्टर' म्हणून ओखळले जाते. जम बसवण्यासाठी त्यांना नेहमीच वेळ लागत असतो. यंदाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची अशीच सुरुवात झाली आहे, पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून रुळावर आणलेली गाडी आता टॉप गिअरमध्ये चालवण्याची जबाबदारी विराट कोहलीचा संघ कशी पार पाडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याची जबाबदारी विराटसह केएल राहुल याच्यावर असणार आहे. आयपीएलमध्ये हे दोघेही चांगले बहरात होते. 

संघात बदल निश्‍चित 
पुढे होणाऱ्या कसोटी मालिकेचे महत्त्व आणि ट्‌वेन्टी-20चे स्पेशालिस्ट लक्षात घेऊन भारतीय संघात प्रामुख्याने गोलंदाजीत बदल संभवत आहेत. जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन महम्मद शमीला खेळवले जाऊ शकते, तसेच दीपक चहरची निवड निश्‍चित वाटत आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यातून नटराजनने यशस्वी पदार्पण केल्यामुळे त्याचे स्थान पक्के असेल. तसेच फलंदाजी अजून भक्कम करण्यासाठी अष्टपैलू फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवऐवजी निवडले जाऊ शकते. फलंदाजीत मात्र धवनबरोबर राहुल सलामीला येण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यांतर विराट, श्रेयस आणि मनीष पांडे अशी क्रमवारी असू शकेल. 

हार्दिक केवळ फलंदाजच 
हार्दिक पंड्याकडे अष्टपैलू म्हणून पाहिले जात असले, तरी गोलंदाजीसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशीबशी चार षटके त्याने टाकली, परंतु त्याचा त्रास झाला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. आता ट्‌वेन्टी-20 मालिकेतही तो गोलंदाजी करणार नाही, परंतु त्याची भरपाई तो फलंदाजी करत आहे. त्याच्या 92 धावा आणि रवींद्र जडेजाच्या 66 धावा यामुळे भारताला निर्णायक धावसंख्या उभारता आली होती. ट्‌वेन्टी-20 मालिकेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. 

मॅक्‍सवेल-स्मिथचा धोका 
ऑस्ट्रेलिया संघातून डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस खेळणार नसले तरी स्टीव स्मिथ आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांच्याकडून भारतीयांना अधिक धोका आहे. एकदिवसीय मालिकेत स्मिथने सलग दोन शतके केली. तर मॅक्‍सवेल तिसरा सामनाही ऑस्ट्रेलियाला जिंकून देण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे या दोन फलंदाजांना रोखून धरले तरच भारतीयांना विजयाच्या आशा बाळगता येतील.


​ ​

संबंधित बातम्या